वांद्रे ते सीप्झ मेट्रो मार्ग जानेवारीपर्यंत सुरू होणार

मेट्रो 3 चा पहिला टप्पा म्हणजेच वांद्रे ते सीप्झ हा मार्ग येत्या वर्षाअखेरीस किंवा जानेवारीपर्यंत सुरू करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

तसेच बहुचर्चित आरे येथील कारशेडचे 54 टक्के काम पूर्ण झाले असून येत्या डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मुंबईत एका पत्रकार परिषदेत दिली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना फडणवीस यांनी मेट्रो 3 सह मुंबईतील सर्वच मेट्रो प्रकल्पांच्या कामांची सद्यस्थिती सांगितली.‘मुंबईसाठी हा सर्वांत महत्त्वाचा प्रकल्प असून 40 किलोमीटरचा हा भूमिगत मेट्रो प्रकल्प आशियातील सर्वांत लांब सिंगल लाइन प्रकल्प आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात आरे कारशेडचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे तीन वर्षे काहीच काम झाले नाही.

नवीन सरकार आल्यानंतर कारशेडच्या कामावरील स्थगिती उठविण्यात आली. बंद असलेले काम पुन्हा सुरू केले. येत्या डिसेंबरपर्यंत कारशेडचे सर्व काम पूर्ण करण्यात येईल. त्यामुळे वांद्रे ते सीप्झदरम्यानचा पहिला टप्पा सुरू करता येणार आहे,’ असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

तिसरी आणि चौथी ट्रेनसुद्धा लवकरच मुंबईत दाखल होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मेट्रो 3 प्रकल्पाचे 80 टक्के पूर्ण झाले,’ अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

‘मुंबई महानगर क्षेत्रात एकूण 337 किलोमीटर लांबीच्या मेट्रोची कामे सुरू आहेत. 2014 ते 2019 या काळात मोठ्या प्रमाणावर मेट्रोचे काम हाती घेण्यात आले. तेव्हा 337 किमीचे हे प्रकल्प अनेकांना स्वप्न वाटत होते. पण, आज यातील नऊ मोठ्या मार्गिकांचे काम 40 ते 70 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

आज एकूण 338 किमीची मेट्रोची कामे सुरू आहेत. एकूण 14 मार्गिका, 225 हून अधिक स्थानके असून सुमारे दीड लाख कोटींहून अधिकची ही कामे आहेत. 2031 पर्यंत एक कोटी प्रवाशांच्या मेट्रो प्रवासाचे नियोजन आहे,’ असे फडणवीस यांनी अधोरेखित केले.


हेही वाचा

मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी वंदे भारत ट्रेन सुपरहिट!

नवी मुंबईहून गेट वे ऑफ इंडिया आणि अलीबागसाठीची स्पीडबोट सेवा बंद

पुढील बातमी
इतर बातम्या