बसगाड्या भाडेतत्वावर घेण्याला बेस्टमधील कामगार संघटनांचा विरोध

ढासळलेल्या आर्थिक स्थितीतून सावरण्यासाठी बेस्ट उपक्रमाने खाजगी बसगाड्या भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाला बेस्टमधील कामगार संघटनांनी विरोध दर्शवला आहे. या संदर्भातील उपाययोजनांबाबत बेस्ट प्रशासन आणि बेस्ट कामगार संघटनांमध्ये झालेली चर्चा गुरूवारी निष्फळ ठरली. कुठल्याही परिस्थितीत बेस्टचं खासगीकरण होऊ देणार नसल्याचं बेस्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी 'मुंबई लाइव्ह'सोबत बोलताना स्पष्ट केलं आहे.

विरोध कशासाठी?

आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडून वेगवेगळे उपाय करण्यात येत आहेत. यामध्ये बसगाड्या भाडेतत्वावर घेण्याचाही उपाय मांडण्यात आला आहे. परंतु, बसप्रमाणे बसचालक देखील भाडेतत्वावर सेवेत आणण्याला कर्मचारी संघटनांनी विरोध केला आहे. याबाबत न्यायालयात याचित दाखल करण्यात आली असून या मुद्दयावर न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आल्याचं, शशांक राव यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, गुरूवारच्या बैठकीमध्ये बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे आणि बेस्ट वर्कर्स युनियनतर्फे शशांक राव यांच्यात चर्चा झाली. या बैठकीत बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी भाडेतत्त्वावर बस घेणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं.

युनियनचा आडमुठेपणा?

तसंच, मुंबईकरांच्या सेवेसाठी १ हजार एसी मिडी, मिनी बस वापरल्यास जास्त प्रवासी वाहून नेल्यास अधिक महसूल मिळेल, असं बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे, बेस्ट प्रशासनाने कामगारांना ग्रॅच्युइटी, अंतिम देयके, अन्य सवलती देणं, वेतन वेळेत देण्याचं प्रस्तावित केलं आहे. मात्र, युनियनच्या आडमुठ्या धोरणामुळे हा प्रस्ताव अमान्य झाला असून कामगाराचे नुकसानं झाल्याचं बेस्ट प्रशासनाचे म्हणणं आहे.


हेही वाचा-

बेस्ट खरेदी करणार १ हजार नवीन बस, टॅक्सी-कॅबला देणार टक्कर

दिवाळी उलटली तरी बेस्ट कर्मचारी बोनसच्या प्रतिक्षेत


पुढील बातमी
इतर बातम्या