राज्यात (maharashtra) वाहन मालक आणि चालकांविरुद्ध आर्थिक फसवणुकीत वाढ झाली आहे.
यामुळे परिवहन विभागाने लोकांना बनावट वेबसाइट्स (Fake website), संशयास्पद मोबाइल अॅप्स (एपीके) (Fake app) आणि बनावट ई-चालान (E-Challan) लिंक्सपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
परिवहन विभागाला असे आढळून आले आहे की, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी आणि ई-चालान यासारख्या सेवांच्या नावाखाली अनेक लोकांना त्यांची वैयक्तिक माहिती आणि आर्थिक व्यवहार शेअर करण्यासाठी फसवले जात आहे.
परिवहन विभागाने म्हटले आहे की फसवणूक करणारे एसएमएस किंवा व्हॉट्सअॅप संदेशांद्वारे अनधिकृत पेमेंट लिंक्स पाठवून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहेत.
तसेच "चालान प्रलंबित आहे," "परवाना निलंबित होणार आहे" असे धमकीचे संदेश फसवणूक करणाऱ्यांकडून पाठवले जातात.
परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की आरटीओ कार्यालय किंवा परिवहन विभाग कधीही व्हॉट्सअॅपद्वारे लोकांना पेमेंट लिंक्स पाठवत नाही.
तसेच, जर तुम्ही 'RTO Services.apk', 'mParivahan_Update.apk', 'eChallan Pay.apk' सारख्या अज्ञात APK फाइल्स डाउनलोड केल्या तर तुमच्या मोबाइलवरून OTP, बँकिंग तपशील आणि इतर संवेदनशील माहिती चोरीला जाण्याचा धोका असतो.
प्रशासनाने नागरिकांना विनंती केली आहे की, त्यांनी फक्त gov.in डोमेन असलेल्या अधिकृत सरकारी वेबसाइट्स वापरावे.
जसे की VAHAN – (वाहन नोंदणी) https://vahan.parivahan.gov.in, SARATHI (ड्रायव्हिंग लायसन्स सेवा) https://sarathi.parivahan.gov.in, https://www.parivahan.gov.in आणि ई-चालान पोर्टल https://echallan.parivahan.gov.in.
त्याचप्रमाणे, वाहन मालकांनी .com, .online, .site, .in किंवा इतर कोणत्याही डोमेन असलेल्या वेबसाइट्सवर माहिती नोंदवू नये.
जर कोणताही संशयास्पद संदेश किंवा लिंक मिळाली तर ताबडतोब राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टल https://www.cybercrime.gov.in, सायबर फसवणूक हेल्पलाइन क्रमांक 1930 किंवा जवळच्या जिल्हा सायबर पोलिस स्टेशनवर तक्रार दाखल करावी.
हेही वाचा