डेबिट, क्रेडिट कार्डाद्वारे घेता येईल मेट्रोचं तिकीट

मेट्रोनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. कारण आता प्रवाशांना मेट्रोचं तिकीट डेबिट-क्रेडिट कार्डद्वारेही मिळणार आहे. मेट्रोचा प्रवास कॅशलेस करण्यासाठी 'मुंबई मेट्रो १' कंपनीनं सर्व स्थानकांवर तिकिटांचे पैसे देण्यासाठी एमटीएम डेबिट आणि क्रेडिट कार्डांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी गुरुवारपासून करण्यात येणार असून त्यामुळं घाटकोपर-वर्सोवा-घाटकोपर या मुंबई ‘मेट्रो वन’चे तिकीट प्रवाशांना आता आणखी सहजतेनं उपलब्ध होणार आहे.

साडेचार लाख प्रवाशांना लाभ

मुंबई मेट्रो वननं प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मासिक ट्रिप पास, स्टोअर व्हॅल्यू पास व स्कीप क्यू या तिकीट अशा सुविधा सुरू केल्या आहेत. तसंच सार्वजनिक वाहतुकीत तिकीट घेताना अनेक प्रवासी डेबिट किंवा क्रेडिट कार्डसारख्या अन्य पर्यायांच्या शोधात असतात. त्यामुळं मुंबई मेट्रो वननं मेट्रो स्थानकांवर डेबिट आणि क्रेडिट कार्ड पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळं प्रवाशांना आता सिंगल जर्नी टोकन, रिटर्न जर्नी टोकन अशा सर्व प्रकारच्या प्रवासासाठी या सुविधेचा वापर करता येणार आहे. तसंच या सुविधेचा लाभ मेट्रोने प्रवास करणाऱ्या साडेचार लाख प्रवाशांना होणार आहे.

इस्टामोजे कंपनीशी करार

ही सुविधा प्रवाशांना मिळावी यासाठी मेट्रो वन कंपनीनं इस्टामोजे या कंपनीशी करार केला आहे. या सुविधेत मेट्रो स्थानकात पीओएस (पॉइंट ऑफ सेल) मशीन कार्यान्वित करण्याची गरज नाही. तसंच प्रवाशांना त्यांच्या मेबाईलमध्ये अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करण्याची गरज नाही. प्रवाशांना मेट्रो तिकीट खिडक्यांवर जाऊन स्टॅटिक क्यूआर कोड मोबाईलवर स्कॅन करून किंवा खिडक्यांवर नमूद केलेली लिंक टाइप करून आणि डेबिट-क्रेडिट कार्डचा तपशील देऊन शुल्क भरता येणार आहे. यानंतर त्यांचे तिकीट किंवा स्मार्ट कार्ड रिचार्ज करून मिळणार आहे.


हेही वाचा -

बेस्ट बसचालकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू


पुढील बातमी
इतर बातम्या