बोरिवली स्थानक ठरलं पहिलं ‘अंधमित्र’ रेल्वे स्थानक

दृष्टीहीन प्रवाशांना बोरिवली स्थानकात होणाऱ्या दररोजच्या अडचणी आता लवकरच इतिहासजमा होणार आहेत. आंतरराष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त कॉक्स अॅन्ड किंग्ज फाऊंडेशन आणि अनुप्रयास तसंच पश्चिम रेल्वे यांनी संयुक्तपणे बोरिवली स्थानकात  उपक्रम राबवले होते. या उपक्रमातंर्गत स्थानकातील पादचारी पुलाचे कठडे, स्थानकाचे प्रवेश व निर्गमन ही ठिकाणे, भूयारी मार्गातील कठडे यांवर ब्रेल लिपीतील मजकूर कोरण्यात आला आहे. तसंच, ब्रेल लिपीतील मजकुराच्या माहितीवर पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या उपक्रमामुळं दृष्टीहिन प्रवाशांना आता बोरिवली स्थानकातून रेल्वेनं प्रवास करणं अधिक सोपे होणार आहे.

दृष्टीहिनांसाठी उपक्रम

 शुक्रवार २८ सप्टेंबर रोजी बोरिवली रेल्वे स्थानकात दृष्टीहिनांसाठी उपक्रम सुरू करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचे उद्घाटन उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, कॉक्स अॅन्ड किंग्ज कंपनीच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन व सीएसआर विभागाचे उपाध्यक्ष थॉमस सी. थोट्टातील आणि अनुप्रयास संस्थेचे संस्थापक व मुख्याधिकारी पंचम काजला यांच्या हस्ते करण्यात आले. कॉक्स अॅन्ड किंग्ज कंपनी ही जगातील सर्वात जुनी व आघाडीवर असलेली प्रवासी कंपनी असून या कंपनीनं सामाजिक कार्यांकरीता एका फाऊंडेशनची स्थापना केली आहे.

 

प्लॅटफॉर्म ओळखता न येणं 

मुंबईत दिव्यांग प्रवाशांना रेल्वे प्रवासात येणाऱ्या समस्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. यामध्ये दृष्टीहिनांना रेल्वे प्रवासात प्लॅटफॉर्म ओळखता येणं ही सर्वात मोठी समस्या असल्याचं दिसून अालं. या समस्येमुळे त्यांच्या गाड्या चुकत असतात. प्लॅटफॉर्म वेळीच ओळखता न आल्याने उशीर झाल्यास दिव्यांग व्यक्ती चालत्या गाडीमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. यामुळं अपघात व मृत्यूचे प्रमाण वाढले होते. स्थानकाचा नकाशा माहीत नसल्याने तेथे असलेल्या विविध सोयी-सुविधांचा लाभ दृष्टीहिनांना घेता येत नव्हता. त्यामुळं दृष्टिहीन प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी कॉक्स अॅन्ड किंग्ज फाऊंडेशन आणि अनुप्रयास संस्था तसंच पश्चिम रेल्वेनं हा उपक्रम राबवला.

माहिती पुस्तिका ब्रेलमध्ये

स्थानकात विशेष इंडिकेटर उभारण्यात आले असून स्थानकाची माहिती पुस्तिका ब्रेल लिपीतून निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळं प्रवाशांना स्थानकाची माहिती ब्रेल लिपीतून मिळाल्याने अनोळखी व्यक्तींशी संभाषण करण्याची गरज उरणार नाही. या पुस्तिकेमध्ये आपत्कालीन प्रसंगी वापरण्याचे दूरध्वनी क्रमांक देखील देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणं दृष्टहिन प्रवाशांसाठी ही पुस्तिका सर्व तिकीट खिडक्यांवर उपलब्ध असणार आहे.


हेही वाचा - 

महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवाशांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी

मध्य रेल्वे मार्गावर विशेष ब्लॉक


पुढील बातमी
इतर बातम्या