विमानानं तिकीट बुक केल्यानंतर २४ तासांच्या आत तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना कॅन्सलेशन चार्ज द्यावा लागत होता. पण यापुढे हा चार्ज देण्याची गरज नाही, हा निर्णय घेत केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी विमान प्रवाशांना दिलासा दिला आहे.
त्याचप्रमाणे २४ तासांच्या आत विमानाच्या तिकीटमध्ये काही बदल करायचे असतील, तर ते देखील मोफत करता येतील, अशीही माहिती जयंत सिन्हा यांनी दिली.
विमानाचं तिकीट बुक केल्यानंतर विमान उड्डाणाची वेळ ९६ तासांपेक्षा जास्त असेल तर, तिकीट बुक केल्यावर २४ तासांच्या आत कॅन्सल केल्यास कॅन्सलेशन चार्ज द्यावा लागणार नाही. त्याचप्रमाणे कॅन्सलेशन चार्ज हे बेसिक फेअर इंधन अधिभारापेक्षा जास्त नसावा, असंही जयंत सिन्हा यांनी सांगितलं.
विमान उड्डाणाच्या वेळेबाबत जर विमान कंपन्यांकडून चूक झाली तर त्याची भरपाई प्रवाशांना देणं कंपन्यासाठी महत्त्वाचं आहे. विमान प्रवास एक दिवस उशिराने होत असेल तर, प्रवाशांच्या राहण्याची व्यवस्था हॉटेलमध्ये करून देणे कंपन्यासाठी बंधनकारक असेल.
त्याचप्रमाणे विमान प्रवास खूप उशिराने होणार असल्यास प्रवाशांनी तिकीट कॅन्सल केली, तर त्यांना संपूर्ण पैसे परत मिळणार आहे, असंही जयंत सिन्हा यांनी सांगितलं.
हेही वाचा-
खूशखबर! 2 ऑक्टोबरचा 'नो नॉन व्हेज डे' रद्द