फुकट्या प्रवाशांकडून ७.६१ कोटींचा दंड वसूल

सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू झाली असली तरी, वेळच बंधन असल्यामुळं अनेक प्रवाशांना धावपळीचा प्रवास करावा लागतो आहे. तर काहीजण विनातिकीट प्रवास करत आहेत. मागील अनेक महिन्यांपासून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली असून त्यांच्या विरोधात कारवाई देखील करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं १५ जून २०२० ते २८ फेब्रुवारीपर्यंत लोकल आणि मेल एक्स्प्रेसवर कारवाईमधील विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करत ७.६१ कोटींचा दंड वसूल केला आहे.

मध्य रेल्वेनं केलेल्या तपासणीत विना तिकीट प्रवास करणाऱ्या २.३८ लाख प्रवाशांकडून ही वसुली करण्यात आली. यापैकी सुमारे १.७५ लाख प्रकरणे लोकलमधील असून, त्यांच्याकडून ५.१० कोटी वसूल करण्यात आले. मेल एक्स्प्रेसमधील ६३ हजार प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करत २.५१ कोटी दंड वसूल करण्यात आला.

ज्येष्ठ नागरिक कोट्याचा दुरुपयोग, बदललेल्या तिकिटावर प्रवास करणे, सिस्टीमद्वारे उत्पन्न तिकिटांचे ई-तिकिटांमध्ये रूपांतर करणे, तिकिटांच्या रंगीत झेरॉक्सने प्रवास करणे, बनावट ओळखपत्रांसह प्रवास करणे, तिकिटांचे हस्तांतरण करण्याची प्रकरणे असे प्रकार मेल-एक्स्प्रेसमध्ये घडत असल्याचे प्रकार यावेळी समोर आले. प्रवाशांनी योग्य आणि वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वे करीत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या