मध्य रेल्वे मार्गावर आणखी २१० सीसीटीव्ही कॅमेरे

मध्य रेल्वे मार्गावरील स्थानकांवर आणखी २१० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात चोरीच्या, अपघाताच्या घटना घडत आहेत. या घटनांच्या तपासणीसाठी तसंच रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे कॅमेरे बसविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

२ हजारहून अधिक कॅमेरे

मध्य रेल्वेने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली असून ऑक्टोबर २०१८ पर्यंत सर्व कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण होणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील स्थानकांवर सध्या २ हजार ९४१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या २ हजार ९४१ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील ९४१ कॅमेरे इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टीम अंतर्गत येतात.

गुन्ह्यांमध्ये वाढ

गेल्या काही वर्षांपासून मध्य रेल्वे मार्गावरील गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होत आहे. या गुन्ह्यांना नियंत्रणात आणण्यासाठी स्थानकांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे. त्यामुळं येत्या काळात मध्य रेल्वे मार्गावर घडणाऱ्या घटना कमी होतील का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दुर्घटनेनंतर जाग

एल्फिन्स्टन रोड स्थानकात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर नेमण्यात आलेल्या समितीने १७ स्थानकांत अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार, १७ स्थानकांवर सीसीटाव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. या १७ स्थानकांमध्ये हार्बर मार्गावरील १३ स्थानकांचाही समावेश आहे.


हेही वाचा-

पश्चिम द्रूतगती मार्ग होणार सिग्नल फ्री

वर्ल्ड बॅँकेचा ४७ एसी लोकलसाठी निधी देण्यास नकार


पुढील बातमी
इतर बातम्या