विमान सेवेतून 'इतक्या' प्रवाशांचं मुंबईत आगमन

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं देशांतर्गत प्रवासी विमानसेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर, तब्बल २ महिन्यांनंतर म्हणजे २५ मे रोजी राज्य सरकारनं विमान सेवेला हिरवा कंदील दाखवला. सोमवारी सकाळी पहिलं विमान रवाना झालं. अत्यंत मर्यादित स्वरूपात सोमवारपासून विमानसेवा सुरू झाली. राज्य सरकारनं २५ विमानांच्या उड्डाणाला व २५ विमानांना येण्याची परवानगी दिली. त्यानुसार, पहिल्या दिवशी मुंबईत ११०० प्रवाशांचे आगमन झाले. त्या तुलनेत तिपटीहून अधिक ३७५२ प्रवासी येथून बाहेर गेले.

सोमवारी सकाळी पहिलं विमान ६.४५ वाजता पाटण्यासाठी रवाना झालं. तर, लखनऊहून सकाळी ८.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिलं विमान उतरलं. एकूण ७ विमानसेवांमार्फत ४७ विमानांची ये-जा झाली. यामध्ये २४ जाणाऱ्या व २३ येणाऱ्या विमानांचा समावेश होता. बेंगळुरू, दिल्ली, हैदराबाद या 'अ' श्रेणीतील शहरांशिवाय नागपूर, गोरखपूर, जयपूर, वाराणसी, दिव, अलाहाबाद, कालिकत, कोची व चंडिगढ या अन्य शहरांचा त्यात समावेश होता. 

सर्वाधिक विमानं दिल्लीसाठी होती. तर, विमानसेवा कंपन्यांनुसार इंडिगोच्या विमानांचा आकडा सर्वाधिक होता. हे वेळापत्रक ३१ मेपर्यंत कायम असणार आहे. यामध्ये कोलकाताची आणखी २ विमानं सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, जुन्या वेळापत्रकानुसार, २५ मेपासून १७ शहरांसाठी ६४ विमाने येथून रवाना होणार होती. परंतु राज्य सरकारच्या कठोर भूमिकेनंतर त्यापैकी ४० विमाने उडू शकली नाहीत. त्यामुळे एकाच दिवसात ४ हजारांहून अधिक प्रवाशांना मुंबईतून प्रवास करता न आल्याची माहिती मिळते.


हेही वाचा -

मुंबईत कोरोना हॉटस्पॉटमध्ये रुग्णवाढ घटली, 'असा' आहे वाॅर्डनुसार रुग्णवाढीचा दर

स्विगी-झोमॅटोला 'काटे की टक्कर', अ‍ॅमेझॉन सुरू करतेय 'ही' सेवा


पुढील बातमी
इतर बातम्या