डेक्कन क्वीन, पंचवटी एक्स्प्रेसमध्ये 'फिरतं ग्रंथालय' सुरू

भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमीत्त सोमवारी संपूर्ण राज्यात 'वाचन प्रेरणा दिन' साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त मध्य रेल्वे मार्गावरील डेक्कन क्वीन आणि पंचवटी एक्स्प्रेसमध्ये 'लायब्ररी ऑन व्हिल्स' (फिरते ग्रंथालय) सुरू करण्यात आलं आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना प्रवासातही वाचनाचा आनंद लुटता येणार आहे.

'वाचनदूत' पुरवणार पुस्तके

राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाचे 'वाचनदूत' या २ गाड्यांमध्ये खास पुस्तकांसाठी तयार करण्यात आलेल्या ट्रॉलीमधून प्रवाशांना वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करुन देत आहेत. या ट्रॉलीचं उद्घाटन मराठी भाषा मंत्री विनोद तावडे व मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. डेक्कन क्वीन (पुणे-मुंबई-पुणे) आणि पंचवटी एक्स्प्रेस (मनमाड-मुंबई-मनमाड) या २ गाड्यांमध्ये 'लायब्ररी ऑन व्हिल्स' (फिरते ग्रंथालय) उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

पासधारकांच्या डब्यात विनाशुल्क

सोमवारी सायंकाळी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून सायंकाळी ५.१० वाजता पुण्याला जाणाऱ्या डेक्कन क्वीन एक्स्प्रेस आणि ६.१५ वाजता 'सीएसटीएम'वरुन नाशिककडे जाणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये ही 'वाचन सेवा' सुरु करण्यात आली आहे. या दोन्ही रेल्वे गाड्यांमधील मासिक पासधारकांसाठी आरक्षित असलेल्या डब्यांमध्ये मराठी भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्थेने 'वाचनदूत' प्रवाशांना विनाशुल्क वाचनसेवा पुरवणार आहेत.

पुस्तके बदलणार

हे पुस्तक मुंबईहून निघाल्यानंतर पुण्याला जमा करावं लागणार आहे. पुन्हा दुसऱ्या दिवशी याच पद्धतीने पुस्तक घेऊन वाचायचे आणि पुन्हा पुस्तक जमा करायचं असा हा उपक्रम आहे. दर २-३ महिन्यानंतर पुस्तके बदलण्यात येणार असल्याने प्रवाशांना वेगवेगळी पुस्तके वाचायला मिळणार आहेत.

आपल्याकडे मराठी, इंग्रजीमध्ये भरपूर पुस्तके आहेत, साहित्य आहेत आणि ज्याला जे वाचायचं आहे, त्याला तशी पुस्तके उपलब्ध करुन देणं हे सरकारला सहज शक्य आहे. सरकारतर्फे १२००० वाचनालयाला पुस्तके देण्यात येतात, त्यामध्ये ही २ वाचनालये वाढलेली आहेत. चांगली दर्जेदार पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्याचं काम शासन करेल.

- विनोद तावडे, मराठी भाषा मंत्री


हेही वाचा-

'परे'नंतर आता 'मरे'वर सुद्धा धावणार एसी लोकल

रुग्णवाहिकेअभावी प्रवाशाची ६ तास मृत्यूशी झूंज; रेल्वेच्या असंवेदनशीलतेचा प्रत्यय


पुढील बातमी
इतर बातम्या