दिवाळी उलटली तरी बेस्ट कर्मचारी बोनसच्या प्रतिक्षेत

दिवाळीमध्ये बोनस मिळण्याची मागणी सातत्याने बेस्टचे कर्मचारी करत होते. या मागणीची दखल घेऊन दिवाळी आधी झालेल्या बैठकीमध्ये महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांना ५५०० रुपयांचा बोनस देण्याचं जाहीर केलं होतं. मात्र, दिवाळी संपली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस मिळालेला नाही. त्यामुळे लवकरात लवकर महाव्यवस्थापकांनी बोनस देण्याची तारीख जाहीर करावी, अशी मागणी बेस्ट समितीच्या सदस्यांनी केली आहे. 

२२ कोटींचा खर्च

आर्थिकदृष्ट्या तोट्यात असणाऱ्या बेस्ट प्रशासनाला कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी २२ कोटी ५८ लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. मात्र, पैसे नसल्यामुळे बोनसची तारीख ठरवता येत नसल्याचे महाव्यवस्थापकांनी सांगितलं अाहे.  पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी महाव्यवस्थापकांना लवकरात लवकर बोनसची तारीख ठरवण्याची सूचना केली अाहे. त्यानुसार, महाव्यवस्थापकांनी येत्या काही दिवसात  बोनसची तारीख ठरवणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांना बोनससाठी आणखी काही दिवसांची वाट पहावी लागणार आहे.

कर्मचाऱ्यांचा अपमान

बेस्टच्या इतिहासात असं पहिल्यांदाच झालं आहे की, बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करूनही तो दिवाळीच्या आधी दिलेला नाही. हा कमिटी आणि कर्मचाऱ्यांचा अपमान असल्याचं रवी राजा यांनी म्हटलं आहे. 


हेही वाचा - 

१ डिसेंबरपासून सायन सर्कल उड्डाणपूल ४ महिन्यांसाठी बंद!

रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर, तिकीट बुकिंगसाठी 15 मिनिटांचा जादा वेळ


पुढील बातमी
इतर बातम्या