Advertisement

१ डिसेंबरपासून सायन सर्कल उड्डाणपूल ४ महिन्यांसाठी बंद!

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील सायन सर्कल उड्डाणपूल दुरूस्तीच्या कामासाठी १ डिसेंबरपासून तब्बल ४ महिन्यांसाठी बंद राहणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएसआरडीसी) तील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'मुंबई लाइव्ह'ला दिली.

१ डिसेंबरपासून सायन सर्कल उड्डाणपूल ४ महिन्यांसाठी बंद!
SHARES

मेट्रोच्या कामासाठी मुंबई शहरासह उपनगरातील अनेक ठिकाणचे रस्ते बंद करण्यात आल्याने मुंबईकरांना वाहतूककोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यात आणखी भर पडणार आहे, ती सायन सर्कल परिसरातील वाहतूककोंडीची. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील सायन सर्कल उड्डाणपूल दुरूस्तीच्या कामासाठी १ डिसेंबरपासून तब्बल ४ महिन्यांसाठी बंद राहणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएसआरडीसी) तील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'मुंबई लाइव्ह'ला दिली. यामुळे पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांची डोकेदुखी वाढणार आहे.


वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा

सायन सर्कल उड्डाणपूल मुंबईतील वाहतुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. बीकेसी, धारावी, कुर्ला, माटुंगा अशा चारही बाजूने वाहनं चेंबूर, नवी मुंबई, पनवेल आणि पुण्याच्या दिशेनं जाण्यासाठी येतात. त्यामुळे या उड्डाणपुलावर आणि उड्डाणपुलाच्या खालच्या रस्त्यावर नेहमीच वाहनांची मोठी गर्दी असते. असं असताना हा उड्डाणपुल दुरूस्तीसाठी ४ महिने बंद ठेवण्याचा निर्णय 'एमएसआरडीसी'ने याआधीच घेतला होता. त्यानुसार १ डिसेंबर ते १ एप्रिल २०१९ दरम्यान हा उड्डाणपूल बंद राहणार आहे.


वेळखाऊ दुरूस्ती

'एमएसआरडीसी'ने काही महिन्यांपूर्वीच सायन उड्डाणपुलाचं आॅडिट केलं होतं. या आॅडिटमध्ये उड्डाणपुलाची शक्य तितक्या लवकर दुरूस्ती करण्याची शिफारस करण्यात आली होती. उड्डाणपुलाच्या जुन्या बेअरिंग्स काढून नवी बेअरिंग्स बसवण्यासह उड्डाणपुलाचे एक्सपांशन ज्वाईंट रिपेअर करण्यासारखी दुरूस्ती करावी लागणार आहे.


५ कोटी रुपयांचा खर्च

तब्बल १४५ बेअरिंग काढून नवीन बेअरिंग लावाव्या लागणार असल्याची माहितीही 'एमएसआरडीसीती'ल वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. हे काम खूपच अवघड आणि वेळखाऊ असल्याने यासाठी किमान ४ महिने लागणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. या कामासाठी ५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.


वाहतूक वळवणार

या कामाकरीता ४ महिन्यांसाठी वाहतूक बंद करत दुरूस्तीच्या कामासाठी परवानगी देण्याची मागणी 'एमएसआरडीसी'ने वाहतूक विभागाकडे मागितली होती. त्यानुसार वाहतूक विभागाने ही मागणी मान्य केली आहे. उड्डाणपुलासह या परिसरातील अन्य रस्त्यांवरील वाहतूक वेगवेगळ्या रस्त्यांवरून वळवण्यात येणार आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती लवकरच वाहतूक विभागाकडून जाहीर होण्याची शक्यता आहे.



हेही वाचा-

बामनडोंगरी, खारकोपर स्थानकावर पहिल्या दिवशी ३,०७२ तिकटांची विक्री

अाणिक-वडाळा फ्लायओव्हरच्या खाली होणार जाॅगिंग पार्क



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा