कुर्ला रेल्वे स्थानकात ई-बाइक सेवा सुरू, कुर्ला ते बीकेसी २५ रुपये दर

कुर्ला रेल्वे स्थानकात उतरून वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) जाणाऱ्या प्रवाशांना आता स्वस्त आणि आरामदायी पर्याय उपलब्ध झाला आहे. कुर्ला रेल्वे स्थानकात ई-बाइक सेवा सुरू करण्यात आली आहे. मध्य रेल्वे आणि युलू कंपनीने सुरू केलेल्या या ई-बाइकचा दर ३० मिनिटांसाठी २५ रुपये असणार आहे.

मोबाईल अॅपवर चालणाऱ्या ई-बाईक सेवेचा शुभारंभ गुरुवारपासून करण्यात आला आहे. मोबाइल अॅपच्या माध्यमाने क्यू आर कोड स्कॅन करून ई-बाइकने प्रवास सुरू करता येईल. वांद्रे-कुर्ला संकुलात १९ ठिकाणी बाइक स्टँड उभारण्यात आले आहेत. त्या स्टँडवर जाऊन ही बाइक उभी करायची आहे. ई-बाइक 'नॉन मोटाराइज्ड व्हेइकल' या प्रकारात येते. यामुळे याला परिवहन किंवा आरटीओची परवानगी लागत नाही. मात्र स्थानिक वाहतूक पोलिसांची एनओसी आवश्यक आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने कुर्ला स्थानकांबाहेर ११५ चौरस मीटर जागा ई सायकल/बाइक पार्किंग आणि चार्जिंगसाठी उपलब्ध केली आहे. याचा कालावधी एक वर्ष असणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. यापूर्वी युलू बाइकने एमएमआरडीए सोबतदेखील ई-बाइक सेवा सुरू केलेली आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरील फलाट क्रमांक १८ जवळ चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. गुरुवारी या चार्जिंग स्टेशनवर ई-कारची चार्जिंगची यशस्वी चाचणी करण्यात आली.


हेही वाचा -

कोरोनामुळं महापालिकेतील 'इतक्या' अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मृत्यू

गेट वे ऑफ इंडिया’च्या परिसरात होणार बदल


पुढील बातमी
इतर बातम्या