Advertisement

कोरोनामुळं महापालिकेतील 'इतक्या' अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मृत्यू


कोरोनामुळं महापालिकेतील 'इतक्या' अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मृत्यू
SHARES

कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी सुरुवातीपासून तत्पर असलेल्या मुंबई महापालिकेतील सुमारे १९७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. तसंच पालिकेतील सुमारे ६ हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यात डॉक्टर, परिचारिका, रुग्णालयीन कर्मचारी यांची संख्या सुमारे सव्वादोन हजाराच्या आसपास आहे.

मुंबई महापालिकेतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना १०० टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आली होती. बेस्टने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बस सेवा सुरू ठेवली होती. बेस्ट बस वा खासगी वाहनांनी कर्मचारी कार्यालय गाठत होती. कोरोनाबाधित रुग्णांना विलगीकरणात ठेऊन संसर्गावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी करोना काळजी केंद्र, करोना समर्पित आरोग्य केंद्रे, जम्बो करोना केंद्रांची उभारणी केली. त्याचबरोबर नायर रुग्णालय करोना रुग्णालय म्हणून जाहीर करण्यात आले.

बेघर, बेरोजगारांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून पालिका अधिकारी, कर्मचारी त्यांना २ वेळचे जेवण पोहोचविण्याचे कामही करीत होते. त्याचबरोबर विलगीकरण, सील इमारत आणि प्रतिबंधित क्षेत्रांतील रहिवाशांना सुरुवातीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही करण्यात येत होते. एकूण परिस्थितीत पालिका अधिकारी, कर्मचारी विविध कामांमध्ये व्यग्र होते.

कोरोनाविषयक कामांमध्ये व्यग्र असलेल्या सुमारे ६ हजार ७९ पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागातील २ हजार ३६४ डॉक्टर, परिचारिका, रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे. एकूण बाधितांपैकी ५ हजार ४७ जण करोनामुक्त झाले आहेत. तर सुमारे १९७ जणांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. सुमारे १५ जणांचा मृत्यूबाबतचा अहवाल अद्याप पालिकेला प्राप्त झालेला नाही.

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांचे प्रमाण अधिक आहे. आतापर्यंत पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील सुमारे ४५ सफाई कामगारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दोन खातेप्रमुख, करनिर्धारण आणि संकलन विभागातील दोन, आरोग्य खात्यातील ३७, अग्निशमन दलातील १० जण सुरक्षा रक्षक खात्यातील १३ जण, ‘परिमंडळ-१’मधील पाच, ‘परिमंडळ-२’मधील चारजण, इतर विभाग व खात्यांतील ७० जणांचा समावेश आहे. त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन विभागातील नऊ कंत्राटी कामगार / आरोग्यसेविकांचाही मृतांमध्ये समावेश आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा