एसी लोकलसाठी पश्चिम व मध्य रेल्वेचं सर्वेक्षण

मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गारेगार व आरामदायी प्रवास मिळावा यासाठी रेल्वे प्रशासनानं एसी लोकल सुरू केली. मात्र एसी लोकलचं तिकीट जास्त आणि प्रवासी संख्या कमी आहे. त्यामुळे प्रवाशांची मते जाणून घेण्यासाठी पश्चिम (western railway) व मध्य (central railway) रेल्वेने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

संपूर्ण एसी लोकल सध्या उपनगरीय रेल्वे मार्गावर धावत असतानाच अर्धवातानुकूलित लोकलचाही पर्याय समोर आला आहे. त्यामुळे या दोन्ही पर्यायांपैकी कोणता पर्याय प्रवाशांना योग्य वाटतो, तसेच सामान्य लोकलच्या जागी येई लोकल चालवणे योग्य आहे का, असे प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यानुसार पर्याय देण्यात आल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली. मागील ५ दिवसांत आतापर्यंत ४ हजार जणांनी मते नोंदविली आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर डिसेंबर २०१७ मध्ये पहिली एसी लोकल दाखल झाली. त्यानंतर मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण मुख्य मार्गावर १७ डिसेंबर २०२० पासून आणि जानेवारी २०२१ पासून ठाणे ते वाशी, पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरही वातानुकूलित लोकल धावली. परंतु तीनही मार्गावरील लोकल गाडीला प्रवाशांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला. सध्या कोरोनाकाळात पश्चिम रेल्वेवरच एसी लोकलची सेवा सुरू असून मध्य रेल्वेवरील मुख्य मार्ग व ट्रान्स हार्बरवर या सेवा तात्पुरत्या बंद ठेवल्या आहेत. 

प्रवाशांचा कमी प्रतिसाद मिळत असल्यामुळे या सेवेचा विस्तार करावा का, सध्याच्या एसी लोकलमध्ये नेमके  काय बदल हवे यासाठी रेल्वेने एसी लोकलबाबत प्रवाशांची मते जाणून घेण्याचा निर्णय घेतला असून सर्वेक्षण सुरू केले आहे.

एसी लोकल का हवी, प्रवाशांना संपूर्ण एसी लोकल हवी की अर्धएसी लोकल, असे विचारतानाच अर्धएसी लोकलमध्ये ३ डबे एसी आणि ९ डबे सामान्य हवे की सहा डबे एसी आणि ६ डबे सामान्य अशी १२ डब्यांची लोकल हे पर्याय दिले आहेत. सामान्य लोकलच्या जागी एसी लोकल चालवणे योग्य आहे का, एसी लोकलच्या भाडेदरात सुधारणा आवश्यक आहे का, यामध्ये प्रथम श्रेणी व द्वितीय श्रेणी असावी का, असल्यास द्वितीय श्रेणीचे भाडे किती असावे यासह अन्य प्रश्न आहेत.


हेही वाचा -

३० ते ४४ वयोगटाचं मोफत लसीकरण

बनावट ओळखपत्रावर लोकल प्रवास करत असाल तर सावधान!

पुढील बातमी
इतर बातम्या