सुट्टीसाठी बाहेर पडलेले मुंबईकर वाहतूक कोंडीत अडकले!

  • मुंबई लाइव्ह टीम & मंगल हनवते
  • परिवहन

बऱ्याच दिवसांनी सलग चार दिवसांची सुट्टी आल्यानं प्लॅनिंग करून मोठ्या संख्येनं मुंबईकर शनिवारी सकाळीच बाहेर पडले खरे. पण पुणे, कोकण आणि गोव्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवर ट्रॅफिक जॅम झाल्यामुळे त्यांची पंचाईत झाली. वाहतुक कोंडीत अडकल्यानं त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचं चित्र आहे.

सलग चार दिवस सुट्ट्या

वीक-एण्डला भटकंतीसाठी मुंबईबाहेर जाणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी आहे. एकीकडे शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत, तर दुसरीकडे शनिवार, रविवार, सोमवार(बुद्धपौर्णिमा) आणि मंगळवार (कामगारदिन-महाराष्ट्र दिन) अशा सलग चार शासकीय सुट्ट्या आल्या आहेत.

मुंबईला जोडणाऱ्या महामार्गांवर कोंडी

त्यामुळेच शनिवारी सकाळपासूनच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे. खंडाळा, लोणावळा, पुणे, कोकण आणि गोवा अशा पर्यटनस्थळांना भेट देण्याकडे मुंबईकर पर्यटकांचा मोठा कल असतो. त्यामुळे शनिवारी सकाळपासून या दोन्ही मार्गांवर वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. अंदाजे पाच किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं सांगितलं जात आहे.

मंगळवारी पुन्हा होऊ शकते कोंडी

ही वाहतुक कोंडी सोडवताना वाहतुक पोलिसांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत वाहतुक कोंडी अशीच राहील असं सांगितलं जात आहे. मात्र, मंगळवारी कोकण-गोवा, पुण्याहून परतताना पर्यटकांना पुन्हा वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागण्याचीही शक्यता आहे.


हेही वाचा

शनिवारपासून बँका सलग ४ दिवस राहणार बंद!

पुढील बातमी
इतर बातम्या