जेट एअरवेजच्या ६ परदेशी फेऱ्या रद्द

आर्थिक तोटा सहन करणाऱ्या जेट एअरवेजनं खर्च कमी करण्यासाठी अनेक विमानांचं उड्डाण थांबवलं असून, परदेशी मार्गांवरील सेवा बंद केल्या आहेत. अशातच आता, जेट एअरवेजनं ६ परदेशी फेऱ्या रद्द केल्या आहेत. यामध्ये मुंबईहून ४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर पुण्याहून २ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

६ परदेशी फेऱ्या रद्द

जेट एअरवेजकडून आखाती देशांकरीता सेवा सुरू होत्या. मात्र, कंपनीकडून सेवेत कमतरता आल्यानं या मार्गांवरील प्रवासी संख्या कमी झाली. त्यामुळे कंपनीनं मुंबई ते अबूधाबी, मुंबई ते बहारिन, मुंबई ते दम्मम, मुंबई ते हाँगकाँग, पुणे ते अबूधाबी, पुणे-सिंगापूर या ६ परदेशी फेऱ्या रद्द केल्या आहेत.

पगार देणं अवघड

जेट एअरवेज कंपनी वर्षभरापासून आर्थिक संकटात आहे. त्यामुळे कंपनीला वैमानिक व अभियंत्यांना वेळेत पगार देणं अवघड ठरत आहे. त्यासाठी कंपनीनं डिसेंबरमध्ये ६ विमानांचे उड्डाण थांबवलं होतं. मात्र, आर्थिक तोट्यात वाढ झाल्यानं जानेवारी महिन्यात हा आकडा १६ वर होता, तर फेब्रुवारीमध्ये ३४ वर गेला. तसंच, मार्चमध्ये कंपनीच्या ताफ्यातील ११४ पैकी फक्त ४१ विमानांचे उड्डाण सुरू असून, कंपनीनं मुंबई, दिल्ली, चेन्नई व कोलकाता, अहमदाबाद, बेंगळुरू, हैदराबाद या शहरांना जोडणाऱ्या विमानसेवा सुरू ठेवल्या आहेत.


हेही वाचा -

मुंबईत तापमानामध्ये वाढ, नागरीकांना उन्हाळ्याची चाहूल


पुढील बातमी
इतर बातम्या