कोकण रेल्वे पावसाळ्यात सज्ज

आगामी पावसाळ्यात गाड्या सुरक्षित आणि सुरळीत चालाव्यात यासाठी कोकण रेल्वेने  उपाययोजना हाती घेतल्या आहेत. अतिवृष्टीमुळे होणारे व्यत्यय कमी करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी रेल्वेने विविध उपक्रम राबवले आहेत. कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक 10 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीत लागू होणार आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये, कोकण रेल्वेने रेल्वे मार्गावर विस्तृत भू-सुरक्षा कार्ये राबवली आहेत, ज्यामुळे दगड पडणे आणि माती घसरण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे.

मान्सूनमध्ये अशी देखरेख

कोकण रेल्वे मार्गावर सुमारे 673 कर्मचारी तैनात करून मान्सून पेट्रोलिंग करण्यात येईल. असुरक्षित ठिकाणं ओळखण्यात आली आहेत. या ठिकाणी सुरक्षारक्षकाची व्यवस्था करण्यात आली आहे. संवेदनशील ठिकाणी वेगावर निर्बंध घालण्यात येणार आहेत.

अतिवृष्टीमुळे लोको पायलटना खबरदारीचा उपाय म्हणून ट्रेनचा वेग 40 किमी प्रति तासापर्यंत कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कार्यालय किंवा स्थानकाशी संपर्क साधण्यासाठी सुरक्षा श्रेणीतील कर्मचाऱ्यांना मोबाईल फोन प्रदान करण्यात आले आहेत. लोको पायलट आणि गार्ड वॉकी-टॉकी सेटसह सुसज्ज आहेत. 

इमर्जन्सी कम्युनिकेशन (EMC) सॉकेट्स रेल्वे मार्गावर सरासरी 1 किमी अंतरावर स्थापित करण्यात आले आहेत, ज्यामुळे गस्त घालणारे, वॉचमन, लोको पायलट, गार्ड आणि देखभाल कर्मचार्‍यांना आपत्कालीन परिस्थितीत स्टेशन मास्तर आणि नियंत्रण कार्यालयाशी संपर्क साधता येईल.

शिवाय, पावसाची नोंद करण्यासाठी आणि पावसाचा जोर वाढल्यास अधिकाऱ्यांना सतर्क करण्यासाठी नऊ स्थानकांवर स्व-रेकॉर्डिंग पर्जन्यमापक बसवण्यात आले आहेत. पाण्याचा प्रवाह धोकादायक पातळीपर्यंत पोहोचल्यास अधिकाऱ्यांना तातडीने सूचित करण्यासाठी पुलांसाठी तीन ठिकाणी पूर चेतावणी प्रणाली लागू करण्यात आली आहे.

चोवीस तास नियंत्रण कक्ष

बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथील नियंत्रण कक्ष पावसाळ्यात परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि गाड्या सुरक्षितपणे धावण्यासाठी 24/7 कार्यरत राहतील. www.konkanrailway.com वर भेट देऊन किंवा 139 वर डायल करून प्रवासी सोयीस्करपणे ट्रेनची स्थिती ऑनलाइन तपासू शकतात.


हेही वाचा

मध्य रेल्वेचा पायाभूत सुविधांवर अधिक भर

बिहारच्या 'त्या' कंपनीला मुंबईतील प्रकल्पांचे काम देण्याला विरोध

पुढील बातमी
इतर बातम्या