परराज्यातून मुंबईत येणाऱ्या विमान प्रवाशांच्या हातावर स्टॅम्प

२५ मेपासून देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली आहे. या विमान सेवेच्या माध्यमातून मुंबईत अडकलेले अनेक प्रवाशी त्यांच्या राज्यात गेले व परराज्यातूनही अनेक प्रवाशी मुंबईत दाखल झाले. परराज्यातून मुंबईत आलेल्या प्रवाशांच्या डाव्या हातावर आता स्टॅम्प मारण्यात येणार असल्याची माहिती मिळते. तसंच, या सर्व प्रवाशांना १४ दिवस घरीच एकांतवासात राहणं बंधनकारक असणार आहे.

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे व नागपूर या तिन्ही विमानतळांवर परराज्यांतून येणाऱ्या प्रवाशांच्या डाव्या हातावर आता स्टॅम्प असणार आहे. मुंबईहून दररोज ५० विमानांच्या ये-जा करण्याला परवानगी देताना राज्य सरकारनं केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांव्यतिरिक्त स्वत:ची नियमावली जाहीर केली आहे.

महाराष्ट्रात राज्य सरकारनं एका विमानतळावरून अधिकाधिक २५ विमानांचे उड्डाण व २५ विमानांच्या उतरण्याला परवानगी दिली आहे. त्यामध्ये सर्वाधिक विमानोड्डाणं अर्थातच मुंबईहून सुरू झाली आहेत. परंतु या सेवेचा वापर करणाऱ्या प्रवाशांना राज्य सरकारच्या नियमावलीचं पालन करावं लागणार आहे.

राज्य सरकारची नियमावली

  • राज्यात दाखल होणाऱ्या कुठल्याही प्रवाशांना करोना नियंत्रण क्षेत्र तसेच हॉटस्पॉट भागात जाता येणार नाही. 
  • हातावर स्टॅम्प असताना १४ दिवसांच्या एकांतवासात ताप, खोकला किंवा श्वसनाशी निगडित त्रास आढळल्यास त्याची माहिती तात्काळ आरोग्य सेतू अॅपवर द्यावी. 
  • ज्या प्रवाशांचे संबंधित विमानतळ असलेल्या जिल्ह्यात किंवा राज्यात अन्यत्र काम आहे व त्यानंतर लगेच परतायचं आहे, अशा ७ दिवसांहून कमी कालावधीसाठी वास्तव्यास असलेल्या प्रवाशांना एकांतवासाचा नियम लागू नसणार आहे. 
  • करोना नियंत्रण क्षेत्र किंवा हॉटस्पॉट किंवा रेड झोनमधील प्रवाशांना विमान प्रवास करता येणार नाही. 
  • विमानतळावर येताना टॅक्सी, वैयक्तिक गाडी किंवा अन्य कुठल्याही वाहनाने येताना सुरक्षित वावराच्या नियमांचे पालन अत्यावश्यक असेल. 
  • सोबत विमान प्रवासाचे तिकीट बाळगावे व ते पोलीसांना दाखविल्याखेरीज विमानतळाकडे सोडले जाणार नाही. 
  • प्रवासाआधी किंवा परराज्यातून आल्यानंतर प्रवाशांमध्ये लक्षणं आढळल्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नियमांनुसार त्यांचं तात्काळ विलगीकरण करण्यात येईल.


हेही वाचा -

मुंबईत कोरोना हॉटस्पॉटमध्ये रुग्णवाढ घटली, 'असा' आहे वाॅर्डनुसार रुग्णवाढीचा दर

स्विगी-झोमॅटोला 'काटे की टक्कर', अ‍ॅमेझॉन सुरू करतेय 'ही' सेवा


पुढील बातमी
इतर बातम्या