मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकाची लिम्का बुक रेकॉर्डमध्ये नोंद

मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड २൦१८ मध्ये नोंद झाली आहे. या स्थानकाची संपूर्ण जबाबदारी महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळेच देशभरात मध्य रेल्वेवरील फक्त महिलांमार्फत चालवलं जाणार माटुंगा हे पहिलं रेल्वे स्थानक ठरलं आहे.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्या पुढाकारातून माटुंगा रेल्वे स्थानकाची जबाबदारी महिला अधिकाऱ्यांना सोपवण्यात आली होती.

महिला सक्षमीकरणासाठी म.रे.चा उपक्रम

मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकाचं व्यवस्थापन, तिकीट आरक्षणापासून ते रेल्वे मालमत्तेच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) अशा सर्वच स्तरावर महिला काम करतात. या स्थानकात अशा एकूण ४१ महिला अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. महिला सक्षमीकरणासाठी मध्य रेल्वेच्या वतीने अनेक उपक्रम राबवले जातात. त्यापैकीच या उपक्रमाला सर्वांनीच चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे आता या उपक्रमाची नोंद लिम्का बुक रेकॉर्डमध्येही करण्यात आली आहे.

ही कल्पना त्यांच्या स्वत: च्या वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी उत्तम आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे.

सुनिल उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

४१ महिला कर्मचारी सांभाळतात संपूर्ण स्थानक

मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकात ४ प्लॅटफॉर्म आहेत. माटुंगा स्थानकातील सर्व कामकाज ४१ महिला अधिकारी-कर्मचारी एकत्रितपणे चालवत आहेत. यात महिला स्टेशन मास्टरसह १७ बुकिंग क्लार्क, ८ तिकीट तपासनीस, ५ पॉईंट अधिकारी, २ अनाऊन्सर आणि २ सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी ६ महिला अधिकारी-कर्मचारी रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने तैनात करण्यात आले आहेत. या पद्धतीने पूर्णत: महिला अधिकारी-कर्मचारी असलेले माटुंगा पहिले स्थानक ठरले आहे. या महिला कर्मचारी गेल्या सहा महिन्यांपासून रेल्वे स्टेशनचे संपूर्ण कामकाज हाताळत आहेत.


हेही वाचा

माटुंगा स्थानकाच्या 'कारभारी' महिला

पुढील बातमी
इतर बातम्या