मुंबई लोकलच्या मासिक पासला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेला सर्वसामान्यांनचा लोकल प्रवास पुन्हा सुरू झाला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे २ डोस घेतलेल्या सामान्य प्रवाशांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली असली तरीही सुट्टीचा दिवस असल्यानं उपनगरीय रेल्वेमध्ये तुरळक गर्दी होती. पारशी नूतनवर्षांनिमित्ताने सरकारी कार्यालयांना सोमवारी सुट्टी असूनही रविवारच्या तुलनेने प्रवासी अधिक होते.

लोकल प्रवासासाठी सामान्यांकडून मासिक पास घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेऊन १४ दिवस उलटून गेलेल्या सामान्य प्रवाशांनी सोमवारीही रेल्वे स्थानकातील मदत कक्षाकडे प्रमाणपत्र पडताळणी व मासिक पाससाठी धाव घेतली. त्यामुळे काही प्रमाणात मध्य व पश्चिम रेल्वे उपनगरीय स्थानकातील तिकीट खिडक्यांसमोर रांगाही लागल्या होत्या.

काही सामान्य प्रवासी तिकीट खिडक्यांवरील कर्मचाऱ्यांना तिकीट उपलब्ध होते का, कधीपासून होऊ शकते अशी विचारणा करीत होते. परंतु मासिक पासच मिळत असल्याची माहिती मिळताच नागरिकांमध्ये नाराजीचाही सूर उमटत होतो.

मध्य रेल्वेवर ११ ते १५ ऑगस्ट या काळात एकूण ९२ हजार ३२४ मासिक पासची विक्री झाली. पश्चिम रेल्वेवरही एकूण ४४ हजार ४८७ पासची विक्री झाली असून बोरिवली स्थानकातून सर्वाधिक पास खरेदी करण्यात आले आहेत.

मध्य रेल्वेवर सोमवारी सर्वाधिक मासिक पास विक्री झाली. सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत एकूण २५ हजार १२४ पास विक्री झाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. तर डोंबिवलीत दोन लसमात्रा घेतलेल्या २ हजार ८३ प्रवाशांनी पास घेतले.

पुढील बातमी
इतर बातम्या