एसटी बसमधून २० किलोपेक्षा जास्त वजनाचं सामान नेल्यास पाचपट भाडं

एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. एसटी बसमधून प्रवास करताना सामान भाड्यासाठी पाचपटीनं तिकीट आकारण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे. त्यानुसार, २७ ऑगस्टपासून सामानाच्या तिकिटाचं किमान भाडे ५ रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत किमीनुसार आकारण्यात येणार आहे. याआधी एसटी महामंडळानं जूनमध्ये प्रवासी भाड्यात वाढ केली होती. त्यानंतर आता प्रवाशांच्या सामानाची भाडेवाढ केली आहे.

पाचपट भाडं

२० किलोपेक्षा अधिक वजनाचं सामान असल्यास पाचपट भाडं आकारण्याचा निर्णय घेतला असून, हा निर्णय राज्यातील प्रत्येक आगारांमध्ये पाठविण्यात आला आहे. तसंच, सामानाच्या भाडेवाढीच्या निर्णयबाबत प्रवाशांना माहिती मिळावी यासाठी प्रत्येक आगारातील फलकावर याबाबत पत्रकं लावण्यात आले आहेत. प्रवासादरम्यान प्रवाशांकडं असलेलं सामान २० किलोपेक्षा कमी वजनाचं असल्यास प्रवाशांना समान मोफत नेता येणार आहे. 

किमान व कमाल दर आकारणी

  • शून्य ते ८४ किमीसाठी २० ते ४० किलोपर्यंतच्या सामानासाठी ५ रुपये आकारण्यात येतील. तसंच, शून्य ते ६०० किमीसाठी २० ते ४० किलोपर्यंतच्या सामानासाठी ५० रुपये आकारण्यात येणार आहेत.
  • शून्य ते ७२ किमीसाठी ४० ते ५० किलोपर्यंतच्या सामानासाठी १० रुपये आकारण्यात येतील. तसंच, शून्य ते ६०० किमीसाठी ४० ते ५० किलोपर्यंतच्या सामानासाठी १०० रुपये आकारण्यात येणार आहेत.


हेही वाचा -

कचरा वेगळा करणाऱ्या हाउसिंग सोसायट्यांना पालिकेकडून मालमत्ता करावर १५ टक्के सूट

स्पाईस जेटच्या विमानासमोर अज्ञात व्यक्ती, थोडक्यात टळला अनर्थ


पुढील बातमी
इतर बातम्या