राज्यभर 'या' 8 नवीन मार्गांवर शिवनेरी बस धावणार

'शिवनेरी' बस सेवेचा आता राज्यभर विस्तार होणार आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी बुधवारी या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली. आता मुंबई-पुणे कॉरिडॉरच्या पलीकडेही प्रवाशांना 'शिवनेरी'चा प्रीमियम प्रवास अनुभवता येणार आहे.

2002 मध्ये सुरू झालेली आणि प्रवाशांच्या विश्वासास पात्र ठरलेली 'शिवनेरी' सेवा आता केवळ मुंबई-पुण्यापुरती मर्यादित राहणार नाही. 

महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाने (MSRTC) आपल्या ताफ्यात 200 नवीन व्होल्वो बसेस समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याद्वारे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांना शिवनेरीने जोडले जाणार आहे.

200 नवीन व्होल्वो बसेसची खरेदी

या विस्तार योजनेसाठी एसटी महामंडळाने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. एसटीकडून 200 नवीन अत्याधुनिक व्होल्वो बसेस खरेदी केल्या जाणार आहेत. या 200 बसेसपैकी 30 बसेस स्लीपर कोच असतील. लांब पल्ल्याच्या मार्गांवर जिथे सध्या साध्या स्लीपर बसेस धावतात, तिथे आता प्रवाशांना प्रीमियम 'स्लीपर शिवनेरी'चा अनुभव मिळेल.

'या' नवीन मार्गांवर सुरू होणार सेवा

  • नाशिक विभाग: नाशिक-पुणे, नाशिक-छत्रपती संभाजीनगर, नाशिक-जळगाव-धुळे.
  • पुणे विभाग: पुणे-कोल्हापूर, पुणे-सांगली, पुणे-सोलापूर.
  • विदर्भ विभाग: नागपूर-चंद्रपूर, नागपूर-अमरावती-अकोला.

"शिवनेरीचा विस्तार हा केवळ बसेसची संख्या वाढवणे नसून, महाराष्ट्राच्या बदलत्या प्रवास संस्कृतीला दिलेली एक नवी दिशा आहे," असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं. 2002 पासून शिवनेरी सेवा नफ्यात आहे. नव्या मार्गांवरही प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इंडियन एक्सप्रेसने याबाबतचं सविस्तर वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

तिकीट दरात मोठी सवलत

शिवनेरीचा प्रवास अधिक सुलभ व्हावा यासाठी महामंडळाने महिला प्रवाशांना 50 टक्के सवलत दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांना (65 ते 75 वर्षे) तिकीट दरात 50 टक्के सवलत आहे. तर 75  वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवास पूर्णपणे मोफत असेल.


हेही वाचा

सीएसएमटी-गोरेगाव मार्गावर एसी लोकल सुरू करण्याचा रेल्वेचा विचार

India-England क्रिकेट मॅचसाठी मेट्रो रात्री उशीरापर्यंत धावणार

पुढील बातमी
इतर बातम्या