नीट आणि जेईईच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. या विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी लोकलनं प्रवास करता येणार आहे. याबाबतचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे घेण्यात आला आहे. मुंबईची लोकल सेवा ही केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असून सामान्यांना अद्याप प्रवासाची परवानगी नाही. त्यामुळं प्रवाशांना प्रवासाची परवानगी मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवेद्वारे परिक्षार्थी नियोजित केंद्रांवर जाऊ शकणार आहेत. याबाबतची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडं केली होती. यानंतर गृह मंत्रालयानं ही परवानगी दिली आहे. लोकलमधून प्रवास करण्यासाठी या विद्यार्थ्यांना परिक्षेचे प्रवेशपत्र दाखवावं लागणार आहे.
त्यानंतर विद्यार्थ्यांना स्थानकांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसोबत परिक्षेच्या दिवशी लोकलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी अतिरिक्त बुकिंग काऊंटर सुरु करण्यात येणार आहेत. प्रवासाच्या काळात विद्यार्थी, पालकांनी सोशल डिस्टन्स पाळणं बंधनकारक आहे. तसंच यासाठी स्टेशनवर गर्दीदेखील टाळावी असं रेल्वेनं काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे.
हेही वाचा -
मुंबईत कोरोनाचे ११७९ नवे रुग्ण, ३२ जणांचा दिवसभरात मृत्यू
राज्यात ११ हजार ८५२ नवे रुग्ण, १८४ जणांचा मृत्यू