मध्य रेल्वे 'आरपीएफ'च्या गस्ती पथकाच्या ताफ्यात ९ वाहने दाखल

उपनगरीय रेल्वे हद्दीत विविध प्रकारच्या चोऱ्या होतात. यात सिग्नलच्या केबल चोरीला जाणे, रेल्वे हद्दीतील विविध मालमत्ता चोरीला जाणे, रुळाजवळ उभे राहून लोकल दरवाजाजवळच उभे असलेल्या प्रवाशाच्या हातावर फटका मारून मोबाइल किंवा अन्य वस्तू लंपास केल्या जातात. या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेनं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मध्य रेल्वे सुरक्षा दलाच्या गस्ती पथकाच्या ताफ्यात ९ वाहने दाखल करण्यात आली आहेत. ही वाहने नऊ उपनगरीय स्थानकांजवळच तैनात असणार आहेत.

या ९ वाहनांमुळं गुन्हेगारांचा मागोवा काढून त्यांना पकडणं शक्य होणार आहे. मध्य रेल्वेच्या निर्णयानुसार, भिवंडी, वडाळा रोड, बेलापूर, कळंबोली, दिवा, सीएसएमटी, माटुंगा, कल्याण, पनवेल या स्थानक हद्दीत ही वाहनं उभी असणार आहेत. पनवेल, कल्याण, माटुंगा, डोंबिवली, घाटकोपर, टिटवाळा, कुर्ला, भायखळा, मुंब्रा या स्थानकांसाठी मिळून आणखी ८ वाहनेही दाखल करण्याचे प्रस्तावित आहे.

रेल्वेची एखादी मोठी घटना घडल्यास लोकल सेवा बंद होऊ शकते. त्यामुळं घडलेल्या घटनेठिकाणी रस्तेमार्गे पोहोचण्यासाठीही या वाहनांचा वापर सुरक्षा दलाकडून होऊ शकतो. गुन्हेगाराकडून त्वरित रेल्वे स्थानकाबाहेर पलायन केले जाते. अशा वेळी उपस्थित रेल्वे सुरक्षा दलाच्या गस्ती पथकाकडे स्थानकाबाहेर स्वत:चे वाहन उभे असते.

त्या वाहनाने गुन्हेगाराचा माग काढला जातो. मात्र सध्या गस्ती पथकाकडील वाहनांची संख्या खूपच कमी आहे. सध्या १८ वाहने ताफ्यात असून आणखी नऊ वाहने दाखल झाल्याची माहिती मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या