नवीन पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचे काम वेगाने सुरू आहे. मुंबई महानगर प्रदेशात मोठ्या पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. हा प्रकल्प मुंबई रेल्वे विकास कॉरपोरेशन मार्फत Mumbai Urban Transport Project (MUTP) फेज III अंतर्गत राबविण्यात येत आहे. यामुळे उपनगरीय रेल्वे जोडणी सुधारण्यास आणि गर्दी कमी करण्यास मदत होणार आहे.
या प्रकल्पातील महत्त्वाचा भाग म्हणजे नढाळ, किरावली आणि वावर्ले हे तीन बोगदे. यापैकी वावर्ले बोगदा सुमारे 2.62 किलोमीटर लांबीचा असून पूर्ण झाल्यानंतर तो मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कमधील सर्वात लांब बोगदा ठरणार आहे.
मुसळधार पावसाळा आणि डोंगराळ भूप्रदेशामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन बोगद्यांमध्ये जलरोधक अस्तर (वॉटरप्रूफ लाइनिंग) बसवण्यात येत आहे. यामुळे पाणी झिरपणे आणि संरचनात्मक नुकसान टाळता येणार असून टिकाऊपणा आणि सुरक्षितता वाढणार आहे.
या कॉरिडॉरमध्ये पारंपरिक दगडी बॅलेस्ट ट्रॅकऐवजी बोगद्यांमध्ये बॅलेस्टलेस (स्लॅब) ट्रॅक बसवण्यात येणार आहेत. काँक्रीट-आधारित हे ट्रॅक कमी देखभालीची गरज भासवतात, अधिक स्थिरता देतात आणि प्रवाशांना अधिक सुरळीत प्रवासाचा अनुभव देतात.
सुरक्षिततेच्या दृष्टीने बोगद्यांमध्ये ठराविक अंतरावर आश्रय क्षेत्र (रेफ्युज एरिया) आणि मजबूत काँक्रीट संरचना उभारण्यात येत आहेत. ज्यामुळे प्रवाशांचे संरक्षण आणि रेल्वे संचालनाची विश्वासार्हता वाढेल.
29.6 किलोमीटर लांबीच्या दुहेरी मार्गिकेचा हा कॉरिडॉर पनवेल आणि कर्जत यांना जोडणार असून मधल्या टप्प्यावर चिखले, पोंयंजे आणि चौक ही स्थानके असतील. प्रकल्पाचा मोठा भाग पूर्ण झाला असून तो सुरू झाल्यानंतर उपनगरीय मार्गांवरील ताण कमी होईल. दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होईल.
हेही वाचा