गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचं आरक्षण फुल्ल

यंदाही गणेशोत्सावर (Ganeshotsav) कोरोनाचं (coronavirus)  सावट आहे. गेल्या गणेशोत्सवात कोकणात (kokan) जायला न मिळालेल्या चाकरमान्यांनी यंदा मात्र आतापासूनच गावी जाण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचं (train) आरक्षण (reservation) आतापासूनच फुल्ल झालं आहे. परतीच्या प्रवासाचंही आरक्षण फुल्ल झालं असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. 

रेल्वेने ५ ते ९ सप्टेंबर या कालावधीत कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांचं आरक्षण फुल्ल झाल्याची माहिती दिली आहे. काही अपवादात्मक गाड्यांच्या एसी टू व थ्री टायरच्या काही जागा शिल्लक आहेत. मात्र, उर्वरित सर्वच क्लाससाठी सर्वच गाड्यांना शेकडो प्रवासी वेटिंगवर आहेत. परतीच्या प्रवासासाठीही १४ तारखेपासून पुढील सहा-सात दिवसांचं आरक्षण फुल्ल झालं आहे.

यंदा १० सप्टेंबरला गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. कोकणातील प्रत्येक घरात गणपती बसवला जात असल्याने या काळात शहरातील लोक आपापल्या गावी जातात. गेल्या वर्षी कोरोनामुळे कोकणात जाण्यास बंदी होती. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासियांचा हिरमोड झाला होता. मात्र, यंदा तीन महिने आधीच चाकरमान्यांनी गावी जाण्याची तयारी केली आहे. 



हेही वाचा -

मुंबईतील झोपडपट्ट्या कोरोनामुक्तीच्या मार्गावर

राजकीय जाहिरातींना लसीकरण केंद्रांवर मनाई

पुढील बातमी
इतर बातम्या