एसटी भरती प्रक्रियेतील गैरप्रकार रोखण्यासाठी टोल फ्री क्रमांक

एसटी महामंडळाकडून सुरू असलेल्या चालक तथा वाहक पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवार व त्यांच्या नातेवाइकांनी प्रलोभनाला बळी न पडता निर्भीडपणे भरती प्रक्रियेत उतरावं, असं आवाहन एसटी महामंडळातर्फे लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना करण्यात आलं आहे. तसंच उमेदवारांना भरती प्रक्रियेबाबत शंका असल्यास किंवा आक्षेपार्ह गोष्टींबाबत तक्रार करायची असल्यास १८००१२१८४१४ या नि:शुल्क दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल. त्यानुसार सबळ पुराव्याच्या आधारे संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असं एसटी महामंडळातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.

अंतिम निवड यादी

२४ फेब्रुवारी २०१९ रोजी राज्याच्या २१ जिल्ह्यांमध्ये सुमारे ८ हजार २२ चालक तथा वाहक पदासाठी लेखी परीक्षा झाली. त्यातील उत्तीर्ण उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी आणि शारीरिक क्षमता चाचणी प्रक्रिया सुरू असून, यापैकी पात्र उमेदवारांना संगणकीय चालन परीक्षेसाठी बोलाविण्यात येणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षा आणि संगणकीय चालन परीक्षा यांच्या संयुक्त गुण तालिकेनुसार अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 

उमेदवारांकडून तक्रारी

कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक पात्रतेमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांना काही लोकांकडून नियमबाह्यरीत्या काम करून अंतिम निवड यादीत नाव समाविष्ट करण्याचं आमिष एजंटकडून दाखविण्यात येत असल्याच्या तक्रारी दूरध्वनीवरून आणि प्रत्यक्ष भेटून काही उमेदवारांनी केल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळानं अशा तक्रारींची गंभीर दखल घेत सध्या सुरू असलेल्या चालक तथा वाहक पदाच्या भरती प्रक्रियेत नियमानुसार कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक पात्रतेची चाचणी पूर्ण करण्यात येत असून कोणताही वशीला अथवा अवैध हस्तक्षेपाने उमेदवाराला भरती केलं जाणार नाही, असं एसटी महामंडळातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.


हेही वाचा -

कोस्टल रोडच्या कामावरील स्थगिती उठवली

नाहीतर, मुंबई विमानतळ बंद करू, भारतीय कामगार सेनेचा इशारा


पुढील बातमी
इतर बातम्या