दहावीतील विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करणाऱ्या शिक्षकांसाठी गुड न्यूज, मिळाली लोकलप्रवासाची मुभा

मुंबई शहर आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या शिक्षकांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. ट्विटरवर त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी शिक्षकांकडून करण्यात येत होती. या मागणीसाठी सोमवारी शिक्षकांनी लोकल स्थानकावर जोरदार आंदोलनही केलं होतं.

वर्षा गायकवाड यांनी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार देखील मानले आहेत. त्या म्हणाल्या की, "माझी मागणी मान्य केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांची आभारी आहे." 

 

दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, "अत्यावश्यक सेवेसाठी पात्र असलेल्या शिक्षकांशी शिक्षण विभागाचे उपसंचालक संमन्वय साधतील. पात्र असलेल्या शिक्षकांना लेवल २च्या पासची लिंक मोबाईलवर पाठवली जाईल. त्या लिंकच्या मदतीनं ते पास डाऊनलोड करू शकतील."    

दहावीच्या मूल्यमापनाच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला केली होती. त्यावर आज निर्णय घेण्यात आल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिलीय. गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीच्या मूल्यमापन प्रक्रियेत सहभागी असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवास करता येणार आहे.

दरम्यान, कोरोनाच्या संकटात काही पालक आपल्या पाल्याचं शालेय शुल्क भरू शकलेले नाहीत. तसंच त्यांना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यावा लागत आहे. अशा विद्यार्थ्यांना शाळेतून शाळा सोडल्याचा दाखला अर्थात TC/LC काही शाळांकडून नाकारली जात आहे. त्यावरही वर्षा गायकवाड यांनी कठोर भूमिका मांडली आहे.

‘प्रत्येक मुलाला शिकण्याचा तसंच एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्याचा अधिकार आहे. सध्याच्या असामान्य परिस्थितीत आर्थिक कारणांमुळे शालेय शुल्क भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला (T.C/L.C) काही शाळा नाकारत असल्याचं कळतंय. विद्यार्थ्यांना TC/LC अभावी प्रवेश नाकारू नये. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, याची मुख्याध्यापकांनी दक्षता घ्यावी. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्यास संबंधित मुख्याध्यापक / शाळाप्रमुख यांच्याविरुद्ध नियमातील आणि कायद्यातील तरतुदीनुसार योग्य ती कारवाई केली जाईल’, असा इशारा वर्षा गायकवाड यांनी दिलाय.

मुंबईच्या शाळांमध्ये शिकवणारे अनेक शिक्षक वसई, विरार, पालघर, कल्याण, पनवेल या ठिकाणाहून येतात. लोकलमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना परवानगी असल्यानं शिक्षकांना सुद्धा त्यामध्ये परवानगी मिळावी जेणेकरून निकालाचं काम तातडीनं पूर्ण करता येईल अशी मागणी शिक्षक संघटनांकडून केली जात होती.  


हेही वाचा

CBSE 10th Result: सीबीएसई दहावीचा निकाल २० जुलैला लागणार

डी.डी. सह्याद्रीवर भरणार शाळा, पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे होणार तास

पुढील बातमी
इतर बातम्या