एसी लोकल ट्रॅकवर, तांत्रिक बिघाड दुरूस्त

  • मुंबई लाइव्ह टीम & नम्रता पाटील
  • परिवहन

पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी स्थानकात सकाळी एसीचं कुलिंग होत नसल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी एसी लोकल अडवली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी संपूर्ण दिवसभर एसी लोकलच्या सर्व फेऱ्या रद्द करण्याचं घोषित केलं होतं. मात्र एसी लोकलमध्ये निर्माण झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त केल्यानंतर संध्याकाळी ५.४९ ला चर्चगेटहून बोरीवलीला जाणारी एसी लोकल सोडण्यात आली.

कधी झाला प्रकार?

प्रवाशांना गारेगार प्रवासाची सेवा देण्यासाठी एसी लोकल सुरू करण्यात आली आहे. परंतु शुक्रवारी सकाळी बोरीवली स्थानकातून सुटलेल्या एसी लोकलमध्ये एसी बिघडल्याने आत बसलेल्या प्रवाशांना चांगलंच उकडू लागलं. या लोकलचे सर्व दारं-खिडक्या बंद असल्याने प्रवाशांना घुसमटल्यासारख व्हायला लागलं. त्यामुळे प्रवाशांनी ही लोकल अंधेरी स्थानकाजवळ २० मिनिटे अडवली.

 

सर्व एसी लोकल रद्द

अखेर रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी दिवसभरातील सर्व एसी लोकलच्या फेऱ्या रद्द करत या एसीत बिघाड झालेली लोकल दुरूस्तीसाठी यार्डात पाठवली. प्रवाशांना एसी लोकल रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून विशेष लोकल गाड्या सोडण्याचाही निर्णय घेतला.

बिघाड दुरूस्त

मात्र काही तासानंतर पश्चिम रेल्वेने ट्विट् करत सकाळी बिघाड निर्माण झालेल्या एसी लोकलमधील तांत्रिक बिघाड दुरूस्त केल्याची माहिती दिली. सोबतच सायंकाळी ५.४९ वाजता चर्चगेटहून बोरीवलीकडे जाणारी एसी लोकल सोडून सेवा पूर्ववत केली. या लोकलनंतर सायंकाळी ७.४९ वाजता चर्चगेट ते विरार आणि रात्री १०.५२ वाजता चर्चगेट ते मुंबई सेंट्रल, या एसी लोकल चालवण्याचाही निर्णय घेण्यात आला.


हेही वाचा - 

मुंबईकरांना रिक्षा, टॅक्सी भाडेवाढीचा झटका!

एलबीएस रोडचा पालिका करणार पुन्हा विस्तार


पुढील बातमी
इतर बातम्या