एसटी महामंडळात कापड घोटाळ्याची चर्चा?

एसटी कर्मचाऱ्यांना कापड देऊन शिलाई भत्ता देण्यात येतो. परंतु, मागील २ वर्ष एसटी कर्मचारी एकाच गणवेशावर आपलं कार्य करत आहेत. २ वर्षांत एकच गणवेश मिळाला असल्यानं कर्मचारी तीव्र नाराजी आहे. त्यातच महामंडळात कापड घोटाळा झाला की काय, याविषयी चर्चा सुरू आहे.

राज्यभरातून तक्रारी

नव्या गणवेशाबाबत मुंबईसह राज्यभरातून तक्रारी येत आहेत. राज्यातील सर्वच विभागांतील कर्मचाऱ्यांना एकूण ६ गणवेशांची प्रतीक्षा कायम आहे. एसटी महामंडळ पूर्वी आपल्या कर्मचाऱ्यांना कापड देऊन शिलाई भत्ता देत होतं. त्याचा एकूण खर्च सुमारे १५ कोटी रुपये होता. त्यापैकी सुमारे ७.५० कोटींची कापड खरेदी आणि उर्वरित रक्कम कर्मचाऱ्यांना शिलाई भत्ता म्हणून दिली जात होती. परंतु, हे बंद करून महामंडळानं थेट शिवून कपडे देण्याचा निर्णय घेतला. यासाठी खासगी कंत्राटदारांशी सुमारे ६४ कोटींचा करारही केला. मात्र, नव्या गणवेशाबाबत माहिती मिळत नसल्यानं महामंडळात कापड घोटाळा झाला की काय, अशी चर्चा अधिकाऱ्यांमध्ये रंगत आहे.

कापड खरेदी

एसटी महामंडळात विविध १६ संवर्गांत (वाहक, चालक, फिटर) कर्मचारी काम करतात. त्यांना दरवर्षी गणवेशासाठी महामंडळाकडून कापड दिलं जातं. मात्र ते पसंत न पडल्याने अनेक कर्मचारी आपल्या सोयीनं कापड खरेदी करून स्वतः गणवेश शिवून घेत. खाकीच्या विविध रंगछटांमुळं एकसारखा गणवेश नसल्यानं थेट कापड शिवून देण्याचा निर्णय तत्कालीन परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी घेतला.

ड्रेसवर रिफ्लेक्टर

महिला वाहकांसाठी साडी किंवा पंजाबी ड्रेस, कोट असा गणवेश आहे. या ड्रेसला रिफ्लेक्टरही लावण्यात आले आहेत. तसंच, रिफ्लेक्टर मेकॅनिकच्या गणवेशालाही लावण्यात आले आहेत. जेणेकरून, जर रात्रीच्या वेळी महामार्गावर बस नादुरुस्त झाली, तर अशा वेळी एसटी जवळ उभ्या असलेल्या चालक, वाहकाच्या ड्रेसवरील रिफ्लेक्टरमुळे इतर वाहनचालकांना याबाबतची माहिती मिळेल. परिणामी संभाव्य अपघाताच्या घटना टळण्यास मदत होणार आहे.


हेही वाचा -

पाकिस्तानच्या गुप्तहेरास मुंबईच्या नौदल डाँकयार्डमधून अटक

अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात महापालिकेची कारवाई, 'इतक्या' हातगाड्या तोडल्या


पुढील बातमी
इतर बातम्या