ठाणे ते वडाळा-घाटकोपर दरम्यानची वाहतूक सुलभ करण्यासाठी उभारण्यात आलेला बहुप्रतिक्षित मेट्रो-४ प्रकल्प अद्याप सुरू झालेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सप्टेंबर 2025 मध्ये ट्रायल रन पार पडली होती. तब्बल नऊ महिने उलटले तरी प्रवासी सेवा सुरू होऊ शकलेली नाही.
मेट्रो-4 हा 32.32 किमी लांबीचा उन्नत मार्ग असून त्यात एकूण 30 स्थानकांचा समावेश आहे. या प्रकल्पाचे काम 2016 मध्ये सुरू झाले होते. सुरुवातीला सहा ते सात वर्षांत काम पूर्ण होईल, असा दावा करण्यात आला होता. मात्र जवळपास दहा वर्षांनंतरही प्रकल्प अपूर्णच आहे.
सप्टेंबर 2025 मध्ये मेट्रोच्या चाचणी फेऱ्या घेण्यात आल्या होत्या आणि मेट्रो रेक्स ट्रॅकवर धावतानाही दिसल्या होत्या. त्यामुळे लवकरच सेवा सुरू होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती. मात्र प्रत्यक्षात अद्याप व्यावसायिक सेवा सुरू झालेली नाही.
विशेषतः घोडबंदर परिसरातील रहिवाशांनी या विलंबावर नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मेट्रो कामामुळे वाहतूक कोंडी, रस्ते अडथळे आणि प्रवासातील विलंबाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, रेल्वे सुरक्षा आयोगाकडून (Railway Safety Commission) आवश्यक सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय मेट्रो सेवा सुरू करता येणार नाही. आयोगाकडून मार्गावरील पायाभूत सुविधा आणि तांत्रिक यंत्रणांची तपासणी केल्यानंतरच अंतिम मंजुरी दिली जाते. मात्र मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (MMRDA) अद्याप अंतिम परवानगी मिळालेली नसल्याचे समोर आले आहे.
राज्य सरकारने यापूर्वी घोडबंदर भागातील काही टप्प्यावर मेट्रो सेवा सुरू करण्याचे संकेत दिले होते. मात्र सुरक्षा प्रमाणपत्र प्रलंबित असल्याने उद्घाटनाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. त्यामुळे ठाण्याची पहिली मेट्रो सेवा अजूनही प्रतीक्षेतच आहे.
हेही वाचा