उल्हासनगरमध्ये 10 वर्षांनंतर परिवहनच्या ई-बसेस सुरू

महानगरपालिकेची ठप्प पडलेली परिवहन सेवा अखेर 10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झाली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यावर उल्हासनगरातील रस्त्यावर 5 बस धावू लागल्या आहेत.

2014 पासून महानगरपालिकेने अनेकदा परिवहन सेवा सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया काढल्या होत्या. पण त्यासाठी कुणीही कंत्राटदार पुढे येत नव्हता. अशावेळी अजीज शेख यांनी आयुक्त पदाचा पदभार हाती घेतल्यावर त्यांनी परिवहन उपआयुक्त अशोक नाईकवाडे व वाहन व्यवस्थापक विनोद केणे यांना परिवहन सेवेच्या निविदेवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले.

त्याचे फलित मिळाले आणि पुण्याच्या कंपनीला परिवहन सेवा हाताळण्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले. कंपनीने प्रथम पुण्यातील भोसरीमध्ये 20 बसेस तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

त्यापैकी धावण्यासाठी सज्ज असलेल्या 5 बसेस उल्हासनगरात दाखल झाल्या होत्या.त्यासाठी मंत्रालयातून बसेसचे तिकीट दर निश्चित करणे आवश्यक होते. त्यानुसार मंत्रालयात मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाची बैठक अपर मुख्य सचिव (परिवहन)यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

त्यात बसच्या तिकीट दरावर शिक्कामोर्तब करण्यात आल्यावर रविवारी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून परिवहन सेवेचे लोकार्पण केले.


हेही वाचा

मुंबई-कोल्हापूर मार्गावर लवकरच धावणार 'वंदे भारत'

मुंबईत पॉड टॅक्सी धावणार, 'या' स्थानकांवर थांबणार

पुढील बातमी
इतर बातम्या