गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांना वंदे भारतचाही पर्याय, कोकणात 'या' जागी थांबा

गणेशोत्सवासाठी नियमित रेल्वेगाड्यांचे आरक्षण पूर्ण झाल्याने कोकणवासीयांना आता 'गोवा-मुंबई वंदे भारत' एक्स्प्रेसचा पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहे.

तेजस एक्स्प्रेसला पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ स्थानकांत थांबा आहे. यामुळे कोकणवासीयांसाठी वेगवान रेल्वे प्रवासासाठी तेजससह वंदे भारतचादेखील पर्याय उपलब्ध राहणार आहे.

वर्षातून एकदा बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा टक्का मोठा आहे. रेल्वे आरक्षण पूर्ण झाल्याने खासगी गाड्यांसाठी दोन ते तीन हजार रुपये मोजून चाकरमानी गावी पोहोचतात. या प्रवाशांना वंदे भारतमुळे दिलासा मिळणार आहे.

मुंबई-मडगाव चेअर कारसाठी १ हजार ७४५ रुपये आणि ईसीसाठी (एक्झिक्युटिव्ह चेअर कार) ३ हजार २९० रुपये तिकीट निश्चित करण्यात आले आहे. यात आयआरसीटीसी खाद्यपदार्थ शुल्काचा समावेश आहे.

मुंबई-मडगाव मार्गावर तेजस एक्स्प्रेस धावत आहे. तेजसचे संपूर्ण प्रवासाचे भाडे चेअर कारसाठी १ हजार ५५५, ईसीसाठी ३ हजार ८० रुपये आहे. 

गोवा वंदे भारत एक्स्प्रेसला कोकणात रोहा, खेड, रत्नागिरी आणि कणकवली या स्थानकांत थांबा देण्यात आला आहे.

दरम्यान, वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन शनिवार होणार होते. पण ओडिशामध्ये झालेल्या रेल्वे अपघातामुळे उद्घाटन कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. अद्याप तरी मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन तारीख निश्चित नसल्याची माहिती समोर येत आहे. 


हेही वाचा

मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे भाडे, वेळ आणि मार्ग, जाणून घ्या संपूर्ण अपडेट

पुढील बातमी
इतर बातम्या