नववर्ष स्वागतासाठी घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनानं दिलासा दिला आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी पश्चिम व मध्य रेल्वेनं विशेष फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरार या मार्गावर ८ विशेष फेऱ्या व मध्य रेल्वेनं ४ विशेष लोकल सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
पश्चिम रेल्वेच्या विशेष फेऱ्या मध्यरात्री ३.२५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. मुंबईकरांच्या सोईसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री ११.१५ वाजता, मध्य रात्री २ वाजता, २.३० वाजता, आणि ३.२५ वाजता चर्चगेटहून विरारसाठी लोकल रवाना होतील. तर विरारहून चर्चगेटसाठी पहिली विशेष लोकल रात्री १२.१५ मिनिटांनी सुटेल. त्यानंतर मध्यरात्री १२.४५ वाजता, १.४० वाजता आणि ३.०५ वाजता विशेष फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.
नववर्षाच्या स्वागतासाठी मध्य रेल्वेने ८ उपनगरांमधून सीएसएमटी परिसरात येणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष सोय केली आहे. मुख्य आणि हार्बर मार्गावर प्रत्येकी दोन-दोन गाड्या धावतील. या लोकल १२ डब्यांच्या असणार आहेत. डाउन मार्गावर कल्याण ते सीएसएमटी दरम्यान रात्री १.३० वाजता, तर अप मार्गावर कल्याण ते सीएसएमटी दरम्यान रात्री १.३० वाजता लोकल चालविण्यात येणार आहे.
हार्बर मार्गावर पनवेल ते सीएसएमटी ट्रेन रात्री १.३० वाजता आणि सीएसएमटी ते पनवेल ट्रेन रात्री १.३० वाजता सुटणार आहे. या लोकल धीम्या मार्गावर चालविण्यात येणार असल्यामुळे त्या सर्व स्थानकांवर थांबविण्यात येणार आहे.
हेही वाचा -
नववर्ष स्वागतासाठी बेस्टची अतिरिक्त बससेवा
‘थर्टी फस्ट’व नववर्ष स्वागतासाठी मुंबई सज्ज!