Lunar Eclipse June 2020 : मुंबईत कसं बघाल छायाकल्प चंद्रग्रहण?

२०२० मध्ये म्हणजे या वर्षी ३० दिवसांमध्ये तीन ग्रहणं पाहण्याचा योग येणार आहे. त्यापैकी पहिलं ग्रहण शुक्रवारी म्हणजेच आज खगोलप्रेमींना पाहता येणार आहे. मोठ्या पौर्णिमेच्या दिवशी होणारे छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे.

५ आणि ६ जूनच्या मध्यरात्री होणारं हे वर्षातलं दुसरं छायाकल्प चंद्रग्रहण होतंय. यावर्षी १० जानेवारीला अशाच प्रकारचं चंद्रग्रहण झालं होतं. एक दुर्मिळ योगायोग म्हणजे याच महिन्यात २१ तारखेला कंकणाकृती सुर्यग्रहणही होणार आहे.

चंद्रग्रहण म्हणजे?

आपली पृथ्वी ही सूर्याभोवती भ्रमण करते आणि चंद्र तिच्याभोवती भ्रमण करतो. ज्यावेळी पृथ्वी चंद्र आणि सुर्याच्या मध्ये येते. त्यावेळी पृथ्वी चंद्रावर पडणारा सुर्यप्रकाश अडवते. चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतोच. तो सुर्याचा प्रकाश परावर्तित करून चमकतो. त्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यानं चंद्राचा पूर्ण किंवा अंशतः भाग झाकोळून जातो. या खगोलीय घटनेलाच चंद्रग्रहण म्हटलं जातं.

छायाकल्प चंद्रग्रहण म्हणजे?

चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट सावलीभोवती असलेल्या विरळ सावलीतून जेव्हा जाते त्यावेळी छायाकल्प चंद्रग्रहण दिसतं. छायाकल्प चंद्रगहणात चंद्र आणि सुर्याच्या मध्ये पृथ्वी आल्यानंतर पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. पण चंद्राच्या आकारात कोणताही फरक दिसत नाही. छायाकल्प चंद्रगहणात चंद्राचा ६५% भाग पृथ्वीच्या छायेत येतो.   

किती वाजता दिसेल?

याला मांद्य चंद्रग्रहण- Penumbral Eclipse असंही म्हणतात. खगोलशास्त्रज्ञांनी या ग्रहणाला 'स्ट्रॉबेरी चंद्रग्रहण' असं नाव दिलंय. भारतातून हे चंद्रग्रहण शुक्रवारी रात्री ११ वाजून १३ मिनिटांपासून ते उत्तररात्री २ वाजून ३७ मिनिटांपर्यंत असणार आहे. भारतासह हे ग्रहण ऑस्ट्रेलिया, यूरोप, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेचा पूर्व दक्षिण प्रदेशातही दिसणार आहे.

२०२० या वर्षात एकूण ४ चंद्रग्रहण होणार आहेत. त्यापैकी पहिलं चंद्रग्रहण १० जानेवारीला झालं आहे. तर उरलेली चंद्रग्रहणं ५ जून, ५ जुलै, ३० नोव्हेंबर रोजी होतील.

सूर्यग्रहण पाहताना डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी लागते पण चंद्रग्रहण हे उघड्या डोळ्यांनी पाहता येतं असं तज्ज्ञ सांगतात. चंद्रग्रहण युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका या खंडात दिसणार आहे.

चंद्रग्रहण पाहता येईल का?

विज्ञान प्रसारचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ टी. व्ही. वेंकटेश्वरन यांच्या मते, आजचं छायाकल्प चंद्रग्रहण इतकं सुस्पष्ट दिसणार नाही. फक्त चंद्रावर हलकीशी सावली पडल्याचं दिसेल. म्हणजेच चंद्र थोडासा अस्पष्ट दिसेल. ते सांगतात, हे चंद्रग्रहण इतक्या सहजपणे पाहता येऊ शकणार नाही. ग्रहण पूर्ण प्रभावात असताना अतिशय लक्ष देऊन पाहावं लागेल. त्यासाठी आकाश मोकळं असावं. तेव्हा चंद्राच्या उत्तर आणि दक्षिण भागातील प्रकाशमानतेचा फरक तुम्हाला कळू शकेल. 

इथं पाहा चंद्रग्रहण : https://www.virtualtelescope.eu/webtv/

याच महिन्यात सूर्यग्रहणसुद्धा

यावर्षी २०२० मध्ये एकूण ६ ग्रहण लागणार आहेत. याध्ये दोन सूर्यग्रहण तर चार चंद्रग्रहण आहेत. यापैकी एक चंद्रग्रहण वर्षाच्या सुरुवातीला १० जानेवारीला झालं होतं. त्यानंतर आता ५ जूनला दुसरं चंद्रग्रहण होणार आहे.

आज होणाऱ्या चंद्रग्रहणानंतर ५ जुलै आणि ३० नोव्हेंबरला सुद्धा चंद्रग्रहण पाहायला मिळणार आहे. याशिवाय सूर्यग्रहण २१ जून आणि १४ डिसेंबर रोजी होणार आहे.


हेही वाचा

मुंबईच्या तापमानात घट, जोरदार पावसाची शक्यता

चक्क मुंबईत गुलाबी पाण्याचं तळं! जाणून घ्या यामागील रहस्य

पुढील बातमी
इतर बातम्या