मागच्या आठवड्यात पत्नी काजोलचा नंबर जगजाहीर केल्याने अचानक सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेला अभिनेता अजय देवगण पुन्हा प्रकाशझोतात आला आहे. ‘इंडियन आयडाॅल’ या रिअॅलिटी शोमध्ये अजय ‘हेलिकॅाप्टर’सह म्हणजेच पत्नी काजोलसोबत पोहोचला आणि स्पर्धकांसोबत धमाल केली.
मागील काही दिवसांपासून काजोल ‘हेलिकॅाप्टर ईला’ या आपल्या आगामी हिंदी सिनेमामुळे चर्चेत असून सध्या ती या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. प्रदीप सरकार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या सिनेमात काजोल मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्तानेच ती ‘इंडियन आयडाॅल’ या गाण्याच्या रिअॅलिटी शोमध्ये पोहोचली. सोबत होते त्यांचे करामती पतीदेव अजय देवगण.
घरातील गोष्टी पडद्यावर
देशाच्या कानाकोपऱ्यात दडलेल्या कलागुणांना हक्काचं व्यासपीठ देणाऱ्या ‘इंडियन आयडाॅल’च्या मंचावर भावी गायकांसोबत उपस्थित राहणं आपल्यासाठी आनंदाची बाब असल्याचं काजोल म्हणाली. ‘हेलिकॅाप्टर ईला’ हा चित्रपट सर्वसामान्यांपासून सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना आपलासा वाटणारा असून, घराघरात घडणाऱ्या लहानसहान गोष्टी या सिनेमाच्या माध्यमातून पडद्यावर पाहायला मिळणार असल्याचं मत अजयन व्यक्त केलं.
‘हेलिकॅाप्टर ईला’ या सिनेमाची निर्मिती अजयने जयंतीलाल गडा आणि अक्षय गडा यांच्या साथीने केली आहे. या चित्रपटात काजोल सिंगल मदरच्या भूमिकेत दिसणार असून, याचं लेखन मितेश शाह आणि आनंद गांधी यांनी केलं आहे. आनंद गांधी यांच्याच ‘बेटा, कागदो’ या गुजराती नाटकावर आधारित असलेला हा सिनेमा पुढील आठवड्यात प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -
सलमान-प्रियांका बनले बॉलिवूडचे ट्रेंडसेटर!
डिजीटल जगतात अनुष्का बनली नंबर वन!