अमिताभ प्रथमच तृतीयपंथीयाच्या भूमिकेत!

एके काळी हिंदी चित्रपटसृष्टीत ‘अँग्री यंग मॅन’ अशी ओळख असणारे अमिताभ बच्चन आज बिग बी म्हणून अबालवृद्धांमध्ये लोकप्रिय आहेत. नेहमीच वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमध्ये दिसलेले अमिताभ प्रथमच तृतीयपंथीयाची भूमिका साकारणार आहेत.

गाण्यात स्त्री वेष धारण

होय, हे खरं आहे. बिग बीच्या चाहत्यांना पुन्हा एकदा त्यांना एका वेगळ्या रूपात पाहण्याची संधी मिळणार आहे. १९८१ मध्ये प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांच्या ‘लावारीस’ या चित्रपटातील ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है…’ या गाण्यात अमिताभ यांनी स्त्री वेष धारण केला होता. त्यानंतर बहुतेक त्यांनी कधीच असा प्रयोग केलेला नाही. त्यामुळे आता ते थेट ट्रांसजेंडरच्या भूमिकेत दिसणार असल्यानं त्यांना पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.

तमिळ चित्रपटाचा रिमेक

याच चित्रपटात अमिताभ पुन्हा एकदा अक्षय कुमारसोबत दिसणार आहेत ही दोघांच्याही चाहत्यांसाठी डबल गुड न्यूज आहे. ‘कंचना २’ या मूळ तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असणाऱ्या चित्रपटासाठी अमिताभ तृतीयपंथीयाचा वेष धारण करणार आहेत. याच चित्रपटात ते पुन्हा अक्षयसोबतही काम करणार आहेत. या चित्रपटात अक्षय-अमिताभ यांचं अनोखं नातंही पाहायला मिळेल. अमिताभ ज्या तृतीयपंथीयाची भूमिका साकारणार आहेत, तो सूड घेण्यासाठी अक्षयच्या शरीराला आव्हान देतो.

हाॅररपट 

हा एक हाॅररपट आहे. मूळ तमिळपटात जी भूमिका सारथ कुमार यांनी साकारली होती, त्या भूमिकेत अमिताभ दिसणार आहेत. याउलट अक्षय एका अशा व्यक्तीची भूमिका साकारणार आहे, ज्याचा भूतांवर विश्वास नाही आणि धाडसी आहे. ‘कंचना’ या सिरीजमधील सर्व चित्रपट दक्षिणेकडे तूफान गाजले आहेत. या चित्रपटाद्वारे दक्षिणात्य दिग्दर्शक राघव लाँरेंस हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. 

वर्षभरापासून बोलणी 

मागील वर्षभरापासून राघव आणि अक्षय यांच्यात या चित्रपटाबाबत बोलणी सुरू होती. बऱ्याच चर्चेनंतर अखेरीस हा चित्रपट हिंदीतही बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरू आहे. यापूर्वी ‘गुड न्यूज’ या चित्रपटात अक्षयची नायिका बनलेली कियारा अडवाणी या चित्रपटात पुन्हा त्याची जोडीदार बनली आहे. तमिळ चित्रपटाप्रमाणे हिंदीतही ‘कंचना’ धमाल करतो का ते पाहायचं आहे.


हेही वाचा -

गोविंदाच्या 'कुली नंबर १' चा रिमेक, 'या' कलाकारांची लागली वर्णी

तीन खानांच्या भेटीमागील रहस्य काय?


पुढील बातमी
इतर बातम्या