राय यांच्या गे लव्ह स्टोरीत आयुष्यमान

फिल्ममेकर आनंद एल. राय यांच्या 'शुभ मंगल सावधान' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा आयुष्यमान खुराना आता त्यांच्याच आगामी गे लव्ह स्टोरीमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे.

शुभ मंगल सावधानचा पुढील भाग 

समलैंगिकतेचा मुद्दा मागील काही वर्षांपासून जगभर चांगलाच गाजत आहे. समाजाचा आरसा म्हणवला जाणाऱ्या रुपेरी पडद्यावरही बऱ्याचदा याचं प्रतिबिंब उमटलेलं पाहायला मिळालं आहे. 'रांझणा', 'तनु वेड्स मनु', 'हॅप्पी भाग जायेगी' या चित्रपटांची यशस्वी निर्मिती-दिग्दर्शन करणाऱ्या आनंद एल. राय यांनाही आता समलैंगिकतेचा मुद्दा खुणावू लागला आहे. ते गे लव्ह स्टोरी पडद्यावर सादर करण्याच्या तयारीत आहेत. राय यांच्या 'शुभ मंगल सावधान' या चित्रपटाचा हा पुढील भाग आहे.

समलैंगिकतेवर आधारित

'शुभ मंगल सावधान' या चित्रपटात आयुष्यमान खुरानानं मुख्य भूमिका साकारली होती आणि आता त्याचा पुढील भाग असणाऱ्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चा नायकही तोच आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं राय आणि आयुष्यमान पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. 'शुभ मंगल सावधान'मध्ये आयुष्यमानची नायिका भूमी पेडणेकर होती. 'शुभ मंगल ज्यादा सावधान' हा चित्रपट मात्र समलैंगिकतेवर आधारित असल्यानं यात आयुष्यमानच्या जोडीला कोण असणार ते पाहायचं आहे.

कलाकारांची निवड सुरू

'शुभ मंगल ज्यादा सावधान'चं दिग्दर्शन हितेश केवल्या करणार आहेत. राय यांनी आपल्या चित्रपटात नेहमीच छोट्या शहरांमधील कथानकांमध्ये महत्त्वपूर्ण विषय अत्यंत साधेपणानं हाताळत यश मिळवलं आहे. त्यामुळं 'शुभ मंगल ज्यादा सावधान'मध्ये समलैंगिकतेसारखा संवेदनशील मुद्दा ते कशा प्रकारे सादर करतात याची उत्सुकता लागली आहे. 'शुभ मंगल ज्यादा सावधान'साठी आपल्याकडं एक उत्तम कथानक असून, त्यातील भूमिका आयुष्यमानसाठीच असल्याचं राय यांचं म्हणणं आहे. सध्या या चित्रपटातील कलाकारांची निवड सुरू आहे. पुढल्या वर्षाच्या सुरुवातीला हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा राय यांचा मानस आहे.


हेही वाचा-

जाहिरातबाजीतही रणवीर-दीपिका अव्वल

विश्वसुंदरी मानुषीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण


पुढील बातमी
इतर बातम्या