जान्हवी कपूरच्या घरात शिरला कोरोना, कुटुंब झालं क्वारंटाईन

बॉलीवूड चित्रपट निर्माता बोनी कपूर (Boney Kapoor) यांच्या घरात कोरोनाव्हायरसनं (coronavirus) शिरकाव केला आहे. त्यांच्या घरात काम करणाऱ्या व्यक्तीला कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचं निदान झालं आहे. बोनी कपूर आपल्या मुलांसह लोखंडवाला स्थित ग्रीन एकर्समध्ये राहत आहेत.

बोनी कपूर यांच्या मुंबईस्थित घरी काम करणारा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं दिसून आलं आहे. २३ वर्षीय चरण साहू नावाचा हा तरुण बोनी कपूर यांच्या घरीच वास्तव्याला आहे. १९ मे रोजी त्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर बोनी यांनी आपल्या कुटुंबासमेवत स्वतःला क्वारंटाईन केलं आहे.

बोनी अंधेरी (मुंबई) च्या लोखंडवाला कॉम्प्लेक्स भागात राहतात. ही बातमी समोर आल्यानंतर त्यांची मोठी मुलगी जान्हवी कपूरनं इंस्टाग्रामवर एक मेसेज शेअर केला आहे.

जान्हवीने लिहिले की, 'याकाळात घरात राहणे हाच सर्वात चांगला उपाय आहे. सर्व सुरक्षित रहा.' जान्हवीच्या या मेसेजवर प्रतिक्रिया व्यक्त करताना कार्तिक आर्यननं लिहिलं की, 'योग्य वेळी जनजागृती केल्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. जनजागृती करणं महत्वाचे आहे'. त्याचवेळी कपूर कुटुंबीयांचे निकटवर्तीय आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी जान्हवीसाठी लिहिलं की, 'सुरक्षित रहा'.

सोशल मीडियावर चाहत्यांनी चिंता व्यक्त केल्यानंतर बोनी कपूर म्हणाले, "माझी मुलं माझ्यासोबत आहेत आणि ते सर्व ठिक आहेत. माझे इतर कर्मचारीही ठिक आहेत. आतापर्यंत आमच्यापैकी कोणामध्येही कोरोनाची लक्षणं दिसली नाहीत. विषेश म्हणजे लॉकडाऊनच्या आधीपासूनच आम्ही आमच्या घरात आहोत. आम्ही घराबाहेर गेलोच नव्हतो"

'आता आम्ही पुढील 14 दिवस सेल्फ-क्वारंटाईनमध्ये राहू. आम्ही बीएमसीच्या मेडिकल टीमकडून मिळालेल्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करू. तसेच, महाराष्ट्र सरकार व महानगरपालिकेच्या तत्काळ प्रतिसादाबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.

''मी ही माहिती देत आहे, कारण अफवा पसरायला नकोत. आम्ही सर्व सुरक्षात्मक उपाय करीत आहोत. आम्हाला आशा आहे की चरण बरा होईल आणि घरी परत येईल.'

मिळालेल्या माहितीनुसार, बोनी कपूर यांच्या घरात काम करणाऱ्या या व्यक्तीची प्रकृती शनिवारपासून बिघडत होती. त्यानंतर बोनी कपूर यांनी त्याला तात्काळ टेस्ट करण्यासाठी पाठवलं. टेस्ट केल्यानंतर त्याला क्वारंटाइन करण्यात आलं होतं. टेस्टचे रिपोर्ट आल्यानंतर बोनी कपूर यांनी सोसायटी, बीएमसी, सरकारला याची माहिती दिली. या कर्मचाऱ्याला आता राज्य सरकारच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठवण्यात आलं आहे.


हेही वाचा

कोरोनामुळे कला विश्वातील 'रत्न' हरपले, ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं निधन

कुत्र्याच्या चाव्यामुळे 'या' अभिनेत्रीचा चेहरा बिघडला

पुढील बातमी
इतर बातम्या