Advertisement

कोरोनामुळे कला विश्वातील 'रत्न' हरपले, ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं निधन

रत्नाकर मतकरी यांच्या निधनामुळे संपूर्ण कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

कोरोनामुळे कला विश्वातील 'रत्न' हरपले, ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं निधन
SHARES

प्रसिद्ध लेखक रत्नाकर मतकरी (Ratnakar Matkari) यांचं रविवारी रात्री निधन झालं. सेवन हिल्स हॉस्पिटलमध्ये रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८१ वर्षाचे होते. त्यांना कोरोनाची (Coronavirus Update) बाधा झाल्याचे निदान झालं होतं. उपचारा दरम्यान त्यांचं निधन झालं. रत्नाकर मतकरी यांच्या निधनामुळे संपूर्ण कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी , आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी अशी त्यांची ओखळ आहे. 

कोरोनामुळे निधन

गेले काही दिवस त्यांना थोडा थकवा जाणवत होता. चार दिवसांपूर्वी गोदरेज रुग्णालयात ते चेकअपसाठी अॅडमिट झाले होते. तेव्हा त्यांची COVID 19 टेस्ट करण्यात आली, जी पॉझिटिव्ह असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना सेवन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


रंगभूमी गाजवणारे साहित्यकार

१९५५ साली, वयाच्या सतराव्या वर्षी, त्यांची ‘वेडी माणसं’ ही एकांकिका आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन प्रकाशित झाली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांचे लेखन अव्याहतपणे चालू होते.

मतकरींची ‘लोककथा ७८’, ‘दुभंग’, ‘अश्वमेध’, ‘माझं काय चुकलं?’, ‘जावई माझा भला’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘घर तिघांचं हवं’, ‘खोल खोल पाणी’, ‘इंदिरा ‘, आणि इतर अनेक नाटके नाट्य रसिकांच्या मनात कायम घर करुन आहेत. अलीकडेच ‘अलबत्या गलबत्या’ आणि ‘निम्मा, शिम्मा राक्षस’ या मुलांच्या, तसच महाभारतातल्या अंतिम पर्वावर आधारीत ‘आरण्यक’ या नाटकांनी रंगभूमी गाजवून सोडली. वास्तवाचे भान देणाऱ्या गूढकथा हा कथाप्रकार त्यांनी एकहाती वाचकांपर्यंत पोहोचवला.


ज्येष्ठ रंगकर्मी हरपला

मोठ्यांसाठी सत्तर तर मुलांसाठी बावीस नाटकं, अनेक एकांकिका, वीस कथासंग्रह, तीन कादंबऱ्या, बारा लेख संग्रह, आपल्या रंगभूमीवरल्या कामाचा सखोल विचार करणारा आत्मचरित्रात्मक ग्रंथ ‘माझे रंगप्रयोग’ अशी त्यांची विपुल साहित्यसंपदा आहे. ‘खेकडा’, ‘गहीरे पाणी’, ‘अश्वमेध’, ‘बेरीज वजाबाकी’ या मालिका, तसच सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला चित्रपट ‘इन्वेस्टमेन्ट’, अशी त्यांची इतर माध्यमामधली कामंही रसिकप्रिय ठरली आहेत.


‘या’ पुरस्कारांनी सन्मानित

रत्नाकर मतकरींना विपुल पुरस्कार आणि सन्मान मिळालेले आहेत. संगीत नाटक अकादेमी आणि साहित्य अॅकेडमी या दोन्ही मान्यवर संस्थांकडून पुरस्कारप्राप्त ठरलेल्या मोजक्या व्यक्तीमत्वात त्यांचा समावेश होतो.


रत्नाकर मतकरींच्या पश्चात निर्मिती आणि अभिनयाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या त्यांच्या पत्नी प्रतिभा मतकरी, कन्या अभिनेत्री सुप्रिया विनोद, पुत्र लेखक/समीक्षक गणेश मतकरी, जावई डाॅ. मिलिंद विनोद, स्नुशा आर्किटेक्ट पल्लवी मतकरी आणि नातवंडे, असा परिवार आहे. मतकरींच्या जाण्यानं साहित्य आणि रंगभूमी या क्षेत्रात एक न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा