आपला ‘सैराट’च 'झिंगाट'!

सिनेमाचा रिमेक म्हटला की त्याची तुलना मूळ भाषेत सुपरहिट ठरलेल्या सिनेमाशी होणं सहाजिक आहे. ‘सैराट’ आणि ‘धडक’च्या बाबतीतही असंच होणार आहे. याच कारणांमुळे ‘धडक’ जरी ‘सैराट’चा रिमेक असला, तरी त्याकडे एक स्वतंत्र सिनेमा या दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे. बरं त्या दृष्टिने जरी सिनेमा बघितला तरी ‘धडक’ पूर्ण पाहिल्यानंतर पुन्हा ‘सैराट’ची आठवण होतेच. त्यामुळेच ‘धडक’पेक्षा गड्या आपला ‘सैराट’च बरा असं वाक्य आपल्या तोंडून निघाल्याशिवाय राहत नाही.

सादरीकरणात फरक

‘धडक’चं दिग्दर्शन शशांक खैतान याने केलं असून, त्याने पूर्णपणे आपल्या नजरेतून हा सिनेमा बनवला आहे. दोन्ही दिग्दर्शकांच्या मांडणीतील किंवा सादरीकरणातील हा फरक सिनेमा बघताना जाणवतो. ‘सैराट’ची फ्रेम टू फ्रेम कॅापी न करता शशांकने त्यात बदल करत आपलेही काही इनपुट्स टाकले आहेत. त्यामुळे ‘धडक’ हा ‘सैराट’पेक्षा काही अंशी वेगळा वाटतो.

'अशी' आहे कथा

गोष्ट आहे उच्चवर्णीय पार्थवी सिंह (जान्हवी कपूर) आणि कनिष्ठवर्णीय मधुकर उर्फ मधू बागला (ईशान खट्टर) यांच्या अल्लड वयातील भोळ्या प्रेमाची... दोघेही एकाच काॅलेजमध्ये शिकत असतात. पार्थवीवर प्रेम करणाऱ्या मधूला स्वप्नातही तिच दिसत असते. पार्थवीचं लक्ष वेधून घेण्यासाठी मधू बऱ्याच उठाठेवी करतो. अखेर पार्थवीही मधूकडे आकर्षित होते. राजेशाही थाटात वाढलेली बिनधास्त स्वभावाची पार्थवी नकळत मधूवर प्रेम करते आणि न घाबरता व्यक्तही करते.

मधूचं मात्र तसं नसतं. पार्थवीबाबत मधूच्या वडीलांना समजताच ते तिच्यापासून दूर राहण्याचं वचन मधूकडून घेतात. त्यामुळे तो तिच्यापासून दूर राहू लागतो, पण खऱ्या प्रेमापुढे कोणाचंच काहीच चालत नाही. पार्थवीचे वडील ठाकूर रतन सिंह (आशुतोष राणा) यांनाही दोघांच्या प्रेमाबाबत समजतं. निवडणूकीला उभे राहिल्याने रतन सिंह तेवढ्यापुरते मूग गिळून गप्प बसतात, पण निवडून येताच मधू आणि त्याच्या मित्रांना पोलिस कोठडीत टाकतात. अखेर पार्थवी-मधूचं प्रेम बंड पुकारतं.

सखोल अभ्यास

या सिनेमाची गोष्ट राजस्थानच्या पार्श्वभूमीवर घडते. त्यानंतर महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर असा प्रवास करीत कोलकातामध्ये पोहोचते. या सर्व ठिकाणांवरील वातावरणनिर्मिती आणि बोलीभाषा यांचा सखोल अभ्यास करून ते सिनेमातील व्यक्तिरेखांच्या माध्यमातून पडद्यावर उतरवण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरले आहेत. कॅास्च्युम आणि कलादिग्दर्शनाचीही याला उत्तम साथ लाभली आहे.

तसं पाहिलं तर आज शहरांच्या ठिकाणी आंतरजातीय विवाह, आंतरधर्मिय विवाहांना पालक मोठ्या मनाने मान्यता देताना दिसतात, पण खेडेगावासारख्या ठिकाणी याकडे मानपानाचा मुद्दा म्हणून पाहिलं जातं. त्यामुळेच वास्तवात आजही आंतरजातीय विवाह नाकारत अनेक प्रेमी जीवांचे बळी घेतले जात आहेत. या सिनेमात हाच मुद्दा मांडण्यात आला आहे.

‘सैराट’पेक्षा वेगळा क्लायमॅक्स

सिनेमा सुरू झाल्यापासून हलके-फुलके विनोद घडवत हसवण्याचा प्रयत्न करतो. मध्यंतरापर्यंत बराचसा भाग ताणल्यासारखा वाटल्याने थोडा कंटाळा येतो. मध्यंतरानंतर काही घटना वेगाने घडतात. जेणेकरून पुढे काय घडणार याबाबत उत्सुकता वाढते. सिनेमाच्या सुरुवातीची स्पर्धा, पळून जाण्याचे सीन्स आणि क्लायमॅक्स चांगला झाला आहे. ‘सैराट’पेक्षा वेगळा क्लायमॅक्स देण्याचा प्रयत्न खेतान यांनी केला आहे.

पण, हृदयात धडकी भरवणारा क्लायमॅक्स पाहून सुन्न मनाने सिनेमागृहातून बाहेर पडताना पुन्हा एकदा ‘सैराट’ची आठवण येतेच. ‘धडक है न...’ या अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजातील गीतासह ‘पहली बार...’ हे गाणं चांगलं झालं आहे, पण मराठी ‘झिंगाट...’ची सर हिंदी ‘झिंगाट...’ला येत नाही.

कलाकारांची अपेक्षापूर्ती

ईशान खट्टरकडून खूप अपेक्षा होत्या. त्या पूर्ण करण्यात तो यशस्वी ठरला आहे. बोलीभाषेपासून, देहबोलीपर्यंत तो पूर्णपणे राजस्थानी वाटतो. जान्हवी कपूरकडून फार कमी अपेक्षा होत्या, त्या तुलनेत तिने बरं काम केलं आहे. असं असलं तरी अजून तिला खूप शिकण्याची गरज आहे. दोघांची केमिस्ट्रीही विशेष जुळलेली नाही.

जान्हवीच्या तुलनेत ईशान फार लहान वाटतो. ईशानच्या मित्रांच्या भूमिकेत अंकित बिष्ट आणि श्रीधर वाटसर यांनीही चांगलं काम केलं आहे. या सिनेमाद्वारे पुनरागमन करत आशुतोष राणा यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत भारदस्त खलनायक साकारला आहे. ऐश्वर्या नारकर, आदित्य कुमार, खराज मुखर्जी यांची कामंही छान झाली आहेत.

‘धडक’चं दिग्दर्शन, तंत्रज्ञान, बजेट आणि एकूणच लवाजमा ‘सैराट’पेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. मोठं बॅनर, भन्नाट पब्लिसिटी, प्रेक्षकांच्या अपेक्षा यामुळे हा सिनेमा बॅाक्स आॅफिसवर ‘सैराट’पेक्षा चांगली कमाई करण्यात यशस्वीही होईलही, पण सिनेमा म्हणून नागराज मंजुळेचा ‘सैराट’च कांकणभर सरस वाटतो.

दर्जा- **१/२  

.....................................

सिनेमा- धडक

निर्माते- करण जोहर, हिरू जोहर, अपूर्वा मेहता

दिग्दर्शक- शंशाक खैतान

कलावंत- ईशान खट्टर, जान्हवी कपूर, अशुतोष राणा, अंकित बिष्ट, श्रीधर वाटसर, ऐश्वर्या नारकर, आदित्य कुमार, खराज मुखर्जी


हेही वाचा-

सई झाली भावूक, सेलिब्रेशन ‘दुनियादारी’च्या पाचव्या वर्षपूर्तीचं…

माझ्यापेक्षा विरूद्ध स्वभावाचे घाणेकर साकारणं कठीण- सुबोध भावे


पुढील बातमी
इतर बातम्या