Advertisement

माझ्यापेक्षा विरूद्ध स्वभावाचे घाणेकर साकारणं कठीण- सुबोध भावे

मागील काही वर्षांपासून अभिनेता सुबोध भावे आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व यांचं एक आगळं वेगळं नातंच जुळलं आहे. ‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य’, ‘कट्यार काळजात घुसली’ या सिनेमांनंतर सुबोध आता डाॅ. काशिनाथ घाणेकरांच्या रूपात भेटणार आहे.

माझ्यापेक्षा विरूद्ध स्वभावाचे घाणेकर साकारणं कठीण- सुबोध भावे
SHARES

सुबोधने जे काही केलं ते अगदी मन लावून... अभिनयापासून, दिग्दर्शनापर्यंत आणि लेखनापासून निर्मितीपर्यंत सिनेनिर्मितीच्या प्रत्येक विभागात सुबोध हिरीरीने काम करत आहे. अशातच ‘आणि... काशिनाथ घाणेकर’ या सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. त्यात डाॅ. काशिनाथ घाणेकरांच्या रूपात सुबोधला पाहून पुन्हा एकदा त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. अपेक्षांचं हे ओझं यशस्वीपणे पेलत सुबोध हे दिव्यही सहजपणे पार करेल अशी त्याच्या सर्व चाहत्यांना आशा आहेच. मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे हे डाॅक्टर साकारण्याबाबत ‘मुंबई लाइव्ह’शी एक्सक्लुझीव्ह बातचीत करताना सुबोधने या सिनेमाबाबतचे सर्व पैलू उलगडले.


जादूई अभिनयाचा बादशहा

डाॅ. काशिनाथ घाणेकर हे नाव आजच्या पिढीला फारसं परिचयाचं नसलं तरी मराठी सिनेसृष्टीतील सुवर्ण काळ पहिलेला आणि जगलेला महान अभिनेता असं त्यांच्याबाबतीत म्हणता येईल. ‘धर्म पत्नी’, ‘पाठलाग’, ‘मराठा तितुका मिळवावा’, ‘मधुचंद्र’, ‘देव माणूस’, ‘अजब तुझे सरकार’, ‘हा खेळ सावल्यांचा’ असे एकापेक्षा एक सिनेमे त्यांनी आपल्या जादुई अदाकारीने सुपरहिट केले आहेत.


घाणेकरांना पाहिलं नव्हतं

‘आणि... काशिनाथ घाणेकर’ या सिनेमात शीर्षक भूमिका साकारण्याबाबत सुबोध म्हणाला की, घाणेकरांबद्दल, त्यांच्या अभिनयशैलीबद्दल बऱ्याच दिग्गजांकडून ऐकून होतो, पण त्यांना कधी पाहिलं नव्हतं. माझा जन्म १९७५ चा आणि घाणेकर १९८६ मध्ये गेले. त्यावेळी माझा अभिनयाशी संबंधही नव्हता. त्यामुळे एक वेगळंच आव्हान होतं.


अभिजीतवर विश्वास

वायकॅाम १८ आणि निर्माते सुनील फडतरे या सिनेमासाठी मला अॅप्रोच झाल्याने पुन्हा एकदा एक आव्हानात्मक भूमिका साकारण्याची संधी मिळाली. हे दिग्दर्शक अभिजीत देशपांडेने पाहिलेलं स्वप्न आहे. ते कसं असावं हे त्याला चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून काम करत गेलो.


घाणेकर साकारण्याचं आव्हान

काशिनाथ घाणेकरांसारख्या थोर अभिनेत्याचा जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर सादर करण्याची आॅफर जेव्हा आली, तेव्हा खरं तर माझा माझ्यावरच विश्वास बसत नव्हता. घाणेकरांबद्दल बरंच काही ऐकलं होतं. त्यांना पाहण्यासाठी लोक कशा प्रकारे वेडे व्हायचे हे देखील ऐकूनच होतो. त्यामुळे ही व्यक्तिरेखा पूर्वी साकारलेल्या भूमिकांपेक्षा अधिक आव्हानात्मक वाटली. अभिजीतने त्यांचा पूर्ण अभ्यास केल्याने त्याच्या सांगण्याप्रमाणे काम गेल्याने हा प्रवास खूप सोपा झाला.


माझ्या स्वभावाविरुद्ध

घाणेकरांचा स्वभाव माझ्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध होता. त्यामुळे अशा व्यक्तिरेखेसाठी माझी निवड करण्याचं श्रेय पूर्णपणे अभिजीतला जातं, पण माझ्यासाठीही मात्र ही भूमिका साकारणं खूप कठीण होतं. कारण परस्पर भिन्न स्वभाव असलेल्या एका महान कलाकाराची व्यक्तिरेखा पडद्यावर जीवंत करायची होती.


वाचनही केलं

कॅमेरा फेस करण्यापूर्वी घाणेकर समाजवे यासाठी काही पुस्तकंही वाचली. त्यातूनही घाणेकरांचे स्वभावविशेष समजत गेले. प्रतिभा ही वीजेसारखी असते. वीज चमकताना जसा लख्ख प्रकाश पडतो तसं प्रतिभेचं असतं. तो प्रकाश एकदा का दिसला की, पुढे सर्व सोपं होतं. नंतर केवळ मेहनत घेणं आपल्या हाती असतं.


लोकांचा विश्वास

बायोपिकच्या आॅफर्स येण्यामागे लोकांचा माझ्यावरील विश्वास असल्याचं मी मानतो. आपण भविष्यात कधीतरी घाणेकरांची भूमिका साकारू असा विचार कधी स्वप्नातही केला नव्हता. फार वर्षांपूर्वी फोटोग्राफर भरत पवारने घाणेकरांसारखा गेट अप करून माझं फोटोशूट केलं होतं. त्यानंतर आता थेट त्यांच्या सिनेमासाठी पुन्हा घाणेकर बनलो. माझ्या घाणेकरांसारख्या दिसण्यात मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचा फार मोलाचा वाटा आहे.


६० ते ८०च्या दशकातील काळ

घाणेकरांनी आपल्या अल्प आयुष्यात खूप प्रसिद्धी मिळवली. मराठी चित्रपटसृष्टीत त्यांचा वचक होता. अशा नायकाचा थक्क करणारा प्रवास या सिनेमात आहे. विशेषत: ६० ते ८० च्या दशकातील काळ या सिनेमात अधोरेखित करण्यात आला आहे. टाळ्यांच्या गजरात आयुष्य जगलेल्या एका महान कलावंताची व्यक्तिरेखा या सिनेमाच्या निमित्ताने पडद्यावर साकारण्याची संधी मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो.



हेही वाचा-

‘पुष्पक विमान’ ची संगीतमय सफर सुरू

सुबोध, श्रुतीची पुन्हा जमली जोडी!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा