‘मर्द को दर्द नहीं होता’ची धमाल पोस्टर्स

निर्माते रानी स्क्रूवाला यांच्या आरएसव्हीपी बॅनरखाली बनलेल्या आणखी एका हिंदी सिनेमाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. ‘मर्द को दर्द नहीं होता’ असं शीर्षक असलेल्या या सिनेमाची तीन धमाल पोस्टर्स नुकतीच लाँच करण्यात आली आहेत.

धमाल कथानक

‘मर्द को दर्द नहीं होता’ या सिनेमाद्वारे राधिका मदान आणि अभिमन्यू दासानी हे दोन नवे चेहरे बाॅलीवूडमध्ये दाखल होत आहेत. या दोन नवोदित कलाकारांची केमिस्ट्री या सिनेमात पाहायला मिळणार आहेच; परंतु त्यासोबतच काहीतरी धमाल कथानकही यात असणार याची चाहूल सिनेमाची पोस्टर्स देतात. आरएसव्हीपीच्या वतीने ‘मर्द को दर्द नहीं होता’ची तीन नवीन पोस्टर्स शेअर करण्यात आली आहेत.

शीर्षक सार्थ

यातील एका पोस्टरमध्ये अंगावर असंख्य मधमाशा बसून चावत असतानाही आरामात पाणी पिणारा अभिमन्यू दिसतो. दुसऱ्या पोस्टरमध्ये झाडाची एक कुंडी अभिमन्यूच्या डोक्यावर आदळते. या अपघातात कुंडी फुटते, पण अभिमन्यूच्या चेहऱ्यावरील हसू मात्र मावळत नाही. तिसऱ्या पोस्टरमध्ये अभिमन्यूच्या पाठीवर टॅटू काढण्यात येत आहे. इथंही तो हसतानाच दिसतो. मधमाशांचं चावणं, कुंडीचं कपाळावर आदळणं आणि टॅटू काढणं या तिन्ही प्रक्रिया फार वेदनादायी आहेत. अशा परिस्थितीतही सिनेमाच्या नायकाला हसताना दाखवणारी ही तीनही पोस्टर्स ‘मर्द को दर्द नहीं होता’ या सिनेमाचं शीर्षक सार्थ ठरवणारी वाटतात.

२१ मार्चला प्रदर्शित

या सिनेमाची कथा जन्मत:च वेदनेप्रती असंवेदनशील असणाऱ्या व्यक्तीभोवती गुंफण्यात आली आहे. या सिनेमानं टीआयएफएफमध्ये मिडनाईट मॅडल अवार्ड पटकावला आहे. यात अभिमन्यूवर मार्शल आर्ट्सच्या मदतीनं अॅक्शनदृश्यंही चित्रीत करण्यात आली आहेत. या सिनेमाची कथा वासन बाळा यांनी लिहिली असून, सिनेमाचं दिग्दर्शनही त्यांनीच केलं आहे. २१ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या ‘मर्द को दर्द नहीं होता’मध्ये राधिका आणि अभिमन्यू या नवोदित जोडीसोबत गुलशन देवैया, महेश मांजरेकर आणि जिमित त्रिवेदी हे कलाकारही आहेत.


हेही वाचा -

यासाठी स्मितानं केसांना दिली तिलांजली!

Movie Review : एका लग्नाची गंमतीशीर गोष्ट


पुढील बातमी
इतर बातम्या