Advertisement

यासाठी स्मितानं केसांना दिली तिलांजली!

. स्मिताने आपल्या आजवरच्या कारकिर्दीत नेहमीच वेगळ्या वाटेने जाणाऱ्या भूमिका साकारल्या आहेत. त्या यशस्वीपणे साकारता याव्यात यासाठी कोणतंही आव्हान स्वीकारण्याची तयारी तिनं दर्शवली आहे. आता 'सावट' या आगामी मराठी सिनेमातील भूमिकेसाठी स्मितानं केस कापले आहेत.

यासाठी स्मितानं केसांना दिली तिलांजली!
SHARES

काही कलाकार चित्रपटातील आपली व्यक्तिरेखा सजीव करण्यासाठी वाट्टेल ते कष्ट घ्यायला आणि वेळप्रसंगी तडजोड करायलाही तयार होतात. या कलाकारांच्या यादीत स्मिता तांबे हिचाही समावेश करावा लागेल. स्मिताने आपल्या आजवरच्या कारकिर्दीत नेहमीच वेगळ्या वाटेने जाणाऱ्या भूमिका साकारल्या आहेत. त्या यशस्वीपणे साकारता याव्यात यासाठी कोणतंही आव्हान स्वीकारण्याची तयारी तिनं दर्शवली आहे. आता 'सावट' या आगामी मराठी सिनेमातील भूमिकेसाठी स्मितानं केस कापले आहेत.


इन्व्हेस्टिगेटींग ऑफिसरची भूमिका

एखाद्या भूमिकेसाठी केस कापणं किंवा टक्कल करणं ही आज नवी गोष्ट राहिलेली नसली तरी, त्या व्यक्तिरेखेत जीव ओतण्यासाठी घेतलेल्या निर्णयामुळे कित्येकदा कलाकारांना इतर सिनेमांवर पाणी सोडावं लागतं. त्यामुळेच एखाद्या कलाकारानं अशा प्रकारचा निर्णय घेतल्यास त्याचं कौतुक होतं. त्या गेटअपमध्ये तो कलाकार दुसरा सिनेमा करू शकत नसतो. 'सावट' मध्ये स्मितानं एका इन्व्हेस्टिगेटींग ऑफिसरची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी तिला आपल्या लांबसडक केसांना तिलांजली द्यावी लागली आहे.


प्रथमच पोलिसाच्या भूमिकेत

सौरभ सिन्हांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'सावट' चित्रपटामध्ये स्मिताने साकारलेली इन्वेस्टिगेटिव्ह ऑफिसरची भूमिका प्रेक्षकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहणारी ठरणार आहे. आपल्या वैविध्यपूर्ण सशक्त स्त्री भूमिकांनी आजवर सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलेली स्मिता या सिनेमाच्या माध्यामातून प्रथमच पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.


रागीट आणि आक्रमक

प्रथमच पोलीस ऑफिसरच्या भूमिका साकारण्याबाबत स्मिता म्हणाली की, आजवर मराठी-हिंदी सिनेमांमधून अनेक अभिनेत्रींनी पोलिसी खाक्या दाखवल्यानं अशा प्रकारच्या भूमिका आपल्याला तशा नवीन नाहीत. म्हणूनच आदिती देशमुखच्या भूमिकेत काहीतरी नावीन्य आणण्याची जबाबदारी माझ्यावर होती. भूमिकेचा अभ्यास करताना मला लक्षात आलं की, आदितीची निरीक्षण क्षमता खूप चांगली आहे. ती शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून गुन्हे सोडवणारी ऑफिसर आहे. आपल्या गतकाळातल्या अनुभवांनंतर ती थोडीशी रागीट आणि आक्रमक बनली आहे. त्यामुळे तिच्या लुकवर आणि शारीरीक अभिनयावरही काम करणं जरूरीचं बनलं.


स्टाइल डेव्हलप

आपल्या भूमिकेविषयी अधिक माहिती देताना स्मिता म्हणाली की, ती साध्या वेशातली पोलीस आहे. त्यामुळं मग ती वेस्टर्न कपडे परिधान करताना पँट कोणत्या आकाराच्या वापरेल, तिच्या बसण्या-उठण्यात, चालण्यात-बोलण्यात कसा अॅटिट्यूड असेल, यावर मी संशोधन केलं. तिचे शूज कसे असतील याचाही विचार केला. कामात व्यग्र असलेल्या आदितीला तयार व्हायला कमीत कमी वेळ लागेल, असेच कपडे असायला हवे होते. तिला केस विंचरायलाही जास्त वेळ लागायला नको. म्हणून हेअरकट केला. केस-स्टडी चालू असताना तिची हातावर लिहायची स्टाइल डेव्हलप केली. तिचं वागणं मॅस्क्युलीन असावं यावरही भर दिला.


थ्रीलर पठडीतला सिनेमा

'सावट' हा एक सुपरनॅचरल थ्रीलर पठडीतला सिनेमा आहे. श्रावण महिन्यातल्या एका ठराविक रात्री एका गावात दरवर्षी एक आत्महत्या होते. सात वर्षात सात आत्महत्या झालेल्या या गावात इन्वेस्टिगेटिव्ह ऑफिसर आदिती देशमुख आत्महत्यांचा तपास करायला येते. मग काय घडतं ते सिनेमात पाहायला मिळतं. हितेशा देशपांडे आणि शोभिता मांगलिक यांच्या साथीने स्मितानं या सिनेमाची निर्मितीही केली आहे. या चित्रपटात तिच्या जोडीला श्वेतांबरी, मिलिंद शिरोळे, संजीवनी जाधव आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.



हेही वाचा -

एसी लोकलची चाचणी मध्य रेल्वेवर

६ वर्षात लोकलमधून ९९ कोटींचे मोबाइल चोरीला



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा