Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,44,063
Recovered:
47,67,053
Deaths:
80,512
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
36,674
1,447
Maharashtra
4,94,032
34,848

Movie Review : एका लग्नाची गंमतीशीर गोष्ट

'लुका छुप्पी' हा सिनेमाही जरी प्रेम, विवाह आणि लिव्ह इन यावर भाष्य करणारा असला तरी आजवर प्रदर्शित झालेल्या सिनेमांपेक्षा खूप वेगळा आहे.

Movie Review : एका लग्नाची गंमतीशीर गोष्ट
SHARES

आजवर लग्नसोहळे आणि विवाह पद्धतींवर आधारित असलेले बरेच सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. यात आजच्या काळातील तरुणाईचे विवाहविषयक विचार आणि त्याला अनुसरून असलेल्या विचारांशी निगडीत असलेल्या सिनेमांचाही समावेश आहे. 'लुका छुप्पी' हा सिनेमाही जरी प्रेम, विवाह आणि लिव्ह इन यावर भाष्य करणारा असला तरी आजवर प्रदर्शित झालेल्या सिनेमांपेक्षा खूप वेगळा आहे. मराठमोळा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरनं हिंदीत पदार्पण करताना एक लाईट हार्टेड कॅामेडी प्लस लव्ह स्टोरी असा काहीसा वेगळा विषय हाताळला आहे.


सिनेरसिकांच्या आवडीचा अचूक वेध

या सिनेमाचं कथानक आजच्या काळातील असून तरुणाईची विचारसरणी दर्शवणारं आहे. या कौटुंबिक-विनोदी सिनेमात कार्तिक आर्यन आणि क्रिती सनोन ही नवी कोरी जोडी आहे. त्या जोडीला ठराविक अंतरानं अनपेक्षितपणे काहीतरी ट्विस्ट असणारं कथानक आहे. त्याला साजेसं संगीत, लोकेशन आणि सादरीकरण या गोष्टीही आहेत. त्यामुळं रुपेरी पडद्यावर लक्ष्मणनं सादर केलेली ही 'लुका छुप्पी' पाहताना खदखदून हसू येतं. हेच या सिनेमाचं यश आहे. 'टपाल' आणि 'लालबागची राणी' या वेगळ्या वाटेवरील मराठी सिनेमांचं दिग्दर्शन केल्यानंतर हिंदीत पदार्पण करताना पूर्णपणे कमर्शिअल आणि युथफूल विषय निवडत लक्ष्मणने हिंदी सिनेरसिकांच्या आवडीचा अचूक वेध घेतला आहे.


प्रेमीयुगुलांच्या विरोधात आंदोलन

या सिनेमाची कथा गुड्डू शुक्ला (कार्तिक आर्यन)आणि रश्मी त्रिवेदी (क्रिती सनोन) यांच्या भोवती फिरते. एक अभिनेता लिव्ह इनला सहमती दर्शवत वक्तव्य करतो आणि संस्कृती रक्षा मंचचे कार्यकर्ता प्रेमीयुगुलांच्या विरोधात मथुरेमध्ये जणू आंदोलनच उभारतात. संपूर्ण मथुरेमध्ये संस्कृती रक्षा मंचची दहशत पसरते. मथुरेतीलच एका लोकल चॅनेलसाठी रिपोर्टिंग करणाऱ्या गुड्डूच्या आॅफिसमध्ये एक दिवस संस्कृती रक्षा मंचचे नेते विष्णू त्रिवेदी (विनय पाठक) येतात. आपली मुलगी रश्मीला इंटनशिप करण्यासाठी चॅनेलमध्ये घेण्यास सांगतात. त्यानंतर एकत्र काम करता करता गुड्डू आणि रश्मीचं एकमेकांवर प्रेम जडतं.


गंमतीशीर कथा

रश्मीला लग्नापूर्वी आपल्या पतीला जाणून घ्यायचं असतं. त्यासाठी ती काही दिवस लिव्ह इनमध्ये राहून मग लग्नाचा विचार करण्याची अट घालते. गुड्डूचा मित्र अब्बास (अपारशक्ती खुराणा) दोघांनाही मदत करण्यास नेहमी तत्पर असतो. कामाच्या निमित्ताने ग्वाल्हेरला गेल्यावर दोघंही एकत्र राहतात. कोणाला संशय येऊ नये म्हणून पती-पत्नी असल्याचं सांगतात, पण एक खोटं लपवताना त्यांना दुसरं खोटं बोलावं लागतं. त्यातच त्यांचं बिंग फुटतं. त्यानंतर पुढे काय घडतं त्याची गंमतीशीर कथा या सिनेमात आहे.


खदखदून हसवण्यात यशस्वी

पटकथा या सिनेमाचा सर्वात मोठा प्लस पॅाइंट आहे. ठराविक अंतरानं कथेत येणारे ट्वि्स्ट आणि प्रसंगानुरूप घटनांद्वारे होणारे विनोद पाहणाऱ्यांना खदखदून हसवण्यात यशस्वी होतात. आजवर कधीही न मांडलेला मुद्दा मांडताना लेखक-दिग्दर्शकानं यात तरुणाईच्या मनातील भावनाही व्यक्त केल्या आहेत. आजच्या तरुणाईवर बंधनं घालाल तर ती लपून छपून का होईना पण आपल्याला जे हवं तेच करेल. त्यामुळं त्यांच्या मनातील भावना समजून घेत काळानुरूप घडणारे बदल स्वीकारत पुढील वाटचाल करणं गरजेचं असल्याचं या सिनेमाच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे.


आपोआप विनोदनिर्मिती

लिव्ह इनमध्ये राहिल्यावर, त्यानंतर आपलं बिंग फुटूनही कुटुंबियांना आपण फसवत असल्याचं शल्य सतावणं, त्यासाठी मग खरोखर लग्न करण्यासाठी धडपड सुरू होणं, त्यात अनेक अडचणी येणं, थोरल्या भावाच्या अगोदर धाकट्याचं लग्न झाल्यानं त्याची कुचंबणा होणं, नायकाच्या वहिनीच्या भावाचं त्याच्यावर लक्ष ठेवून लावालावी करणं, गुड्डूच्या बाबतीत कुटुंबियांचा गैरसमज होणं या गोष्टी अगदी खुमासदार शैलीत सादर केल्यानं आपोआप विनोदनिर्मिती होते. सिनेमाची गती वेगवान असल्यानं घटना वेगात घडतात. त्यामुळं पुढे काय घडणार याबाबत उत्सुकता वाढते. ठराविक अंतरानं येणारे ट्विस्ट उत्कंठा आणखी वाढवतात. क्लायमॅक्सच्या दृश्यातील धमाल आणि सत्य कथन तरुणाईसाठी बोधप्रद आहे. हा सिनेमा उपदेशाचे डोस न पाजता विनोदाच्या सहाय्यानं बरंच काही सांगतो.


तांत्रिक बाबीही दमदार

दिग्दर्शकाच्या रूपात लक्ष्मण उतेरकनं एक सुंदर सिनेमा बनवला आहे. एका सुरेख वनलाईनवर आधारित असलेला हा सिनेमा बनवताना त्यानं मेलोड्रामा करण्याचा मोह टाळला हे विशेषत्वानं नमूद करावं लागेल. कोणताही प्रसंग जास्त लांबणार नाही किंवा अतिरंजीत होणार नाही याची काळजी घेतली. सिनेमातील गाणीही चांगली आहेत. लोकेशन्स, छायांकन, कॅास्च्युम डिझायनिंग, संकलन या तांत्रिक बाबीही दमदार आहेत. सिनेमाच्या शेवटी असलेल्या गाण्यात कार्तिक-क्रितीचा डान्स पाहायला मिळतो.


सहकलाकारांचा सहजसुंदर अभिनय

कार्तिक आणि क्रिती यांची फ्रेश जोडी आणि त्यासोबत इतर सहकलाकारांचा सहजसुंदर अभिनय या सिनेमाचा आणखी एक प्लस पॅाइंट आहे. या सिनेमाच्या निमित्तानं कार्तिक-क्रिती प्रथमच एकत्र आले असले, तरी त्यांची केमिस्ट्री चांगलीच जुळली आहे. कार्तिकची आपली एक वेगळी शैली असून, क्रितीचीही काहीशी निराळीच अदा आहे. या दोघांचं मिश्रण या सिनेमात सुरेखरीत्या सादर करण्यात आलं आहे. आजवर कधी गंभीर तर कधी ग्रे शेडेड भूमिका साकारणारा पंकज त्रिपाठी या सिनेमात विनोदी मूडमध्ये लक्ष वेधून घेतो. विनय पाठकनं साकारलेला राजकारणीही दमदार आहे. अपारशक्ती खुराणानं पुन्हा एकदा मित्राच्या भूमिकेत अचूक टायमिंगचं दर्शन घडवलं आहे. या जोडीला अतुल श्रीवास्तव, अलका अमिन, हिमांशु कोहली, विश्वनाथ चॅटर्जी, नेहा सराफ, मास्टर समर्थ या कलाकारांनीही सुरेख काम केलं आहे.

या सिनेमाचा विषय जरी आजवर अनेकदा आलेला असला तरी तरी सादरीकरणातील नावीन्य आणि कलाकारांचा अभिनय पाहण्याजोगा आहे. त्यामुळंच प्रत्येकानं एकदा तरी वेळ काढून हा सिनेमा पाहायला हवा.

दर्जा : ***१/२

.............................................................................

निर्माते : दिनेश विजान

दिग्दर्शक : लक्ष्मण उतेकर

कलाकार : कार्तिक आर्यन, क्रिती सनोन, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराणा, विनय पाठक, अतुल श्रीवास्तव, अलका अमिन, हिमांशु कोहली, विश्वनाथ चॅटर्जी, नेहा सराफ, मास्टर समर्थ, अजीत सिंग, अरुण सिंग, सपना संदहेही वाचा -

डहाणू, तलासरीला पुन्हा भूकंपाचा धक्का, आतापर्यंतचा सर्वाधिक तीव्रतेचा भूकंप

एसी लोकलची चाचणी मध्य रेल्वेवरसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा