अखेर श्रीदेवी यांचं पार्थिव मुंबईत आणण्यास परवानगी

गेल्या दोन दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूबाबत निर्माण झालेलं गूढ अखेर निवळलं आहे. श्रीदेवी यांचा मृत्यू हा बाथटबमध्ये बुडाल्यामुळेच झाल्याचं स्पष्ट झालं असून त्यांना डोक्याला जखम झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यानंतर बाथटबमध्ये बुडाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. तसेच, सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचे पार्थिव दुबईहून मुंबईला नेण्याची परवानगी त्यांच्या कुटुंबीयांना मिळाली आहे.

बुधवारी होणार अंत्यसंस्कार

दुबईहून नुकत्याच हाती आलेल्या अपडेट्सनुसार श्रीदेवी यांचं पार्थिव आज म्हणजेच मंगळवारी रात्री उशीरा मुंबईत दाखल होणार आहे. उद्या, म्हणजेच बुधवारी सकाळी विलेपार्लेतल्या पवनहंस स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याआधी अंधेरी येथील सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तिथून पवनहंस स्मशानभूमीपर्यंत त्यांची अंत्ययात्रा निघेल. यासंदर्भात कपूर कुटुंबीयांकडून पत्रक जारी करून ही माहिती देण्यात आली आहे.

कार्डिअॅक अरेस्ट नव्हे, बुडाल्यानेच मृत्यू

शनिवारी मध्यरात्री श्रीदेवी यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं वृत्त पसरलं होतं. त्यांच्या हॉटेल रूमच्या बाथटबमध्ये त्या पडलेल्या आढळून आल्या. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं. त्यांच्या पार्थिवाचं शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचं निधन ह्रदयविकाराने नसून बाथटबमध्ये बुडाल्यामुळे झाल्याचं समोर आलं. तसेच, त्यांच्या डोक्याला जखमही झाल्याचं समोर आलं. त्यामुळे बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यामुळे बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचं निदान फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये करण्यात आलं.


हेही वाचा

श्रीदेवी यांच्या कॉल रेकॉर्ड्सची तपासणी

पुढील बातमी
इतर बातम्या