राणीनं पुन्हा चढवली खाकी

लग्नानंतर ब्रेक घेतलेली अभिनेत्री राणी मुखर्जी मागील काही वर्षांपासून चित्रपटसृष्टीत पुन्हा सक्रिय झाली आहे. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मर्दानी' या चित्रपटानंतर राणीनं पुन्हा एकदा खाकी परिधान केली आहे.

मर्दानीचा सिक्वेल

दिग्दर्शक प्रदिप सरकार यांच्या 'मर्दानी' या चित्रपटात राणीनं सिनीयर इन्स्पेक्टर शिवानी शिवाजी रॅाय ही दमदार व्यक्तिरेखा उत्कृष्टपणे साकारली होती. या भूमिकेचं सर्वच स्तरांतून कौतुक झालं होतं. 'मर्दानी २' च्या रूपात या चित्रपटाचा सिक्वेल बनवला जात आहे. या चित्रपटात राणी पुन्हा शिवानीच्या भूमिकेत दिसणार असून, त्यासाठी तिला पुन्हा खाकी चढवावी लागली आहे. नवोदित दिग्दर्शक गोपी पुथ्रम या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. गोपी यांनीच 'मर्दानी'ची कथा लिहिली होती आणि 'मर्दानी २'चं लेखनही त्यांनीच केलं आहे.

खलनायकाचं आव्हान

'मर्दानी'मध्ये शिवानीच्या भूमिकेत राणीनं लहान मुलांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. 'मर्दानी २'मध्ये त्यापुढील कथा पाहायला मिळेल. या चित्रपटात राणी सुप्रिटेंडन्ट आॅफ पोलिस बनली आहे. तिचा लुक अतिशय डॅशिंग आणि प्रेरणादायी वाटतो. या चित्रपटात तिच्यासमोर एका २१ वर्षाच्या खलनायकाचं आव्हान असणार आहे. या व्हीलनचा ती कशाप्रकारे सामना करते आणि त्याच्या मुसक्या आवळते ते या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यश राज फिल्म्सच्या बॅनरखाली आदित्य चोप्रा या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.


हेही वाचा -

विकीचा उधमी लुक पाहिला का?

आफताब शिवदासानी दिसणार पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत


पुढील बातमी
इतर बातम्या