सोनू सूदच्या अनधिकृत बांधकामप्रकरणी सुनावणी १३ जानेवारीपर्यंत तहकूब

अनधिकृत बांधकामप्रकरणी मुंबई महापालिकेने अभिनेता सोनू सूद विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सोनू सूदने मुंबई उच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल केली. या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने सुनावणी १३ जानेवारीपर्यंत तहकूब केली. त्यामुळे सोनू सूदला काहीसा दिलासा मिळाला आहे.

अभिनेता सोनू सूद याच्या जुहू येथील सहा मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेने सोनू सूदविरोधात जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सोनू सूद याने मुंबई महापालिकेविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली.  सोनू सुदने जुहू येथील शक्ती सागर रहिवासी इमारतीचे कोणत्याही परवानगीशिवाय हॉटेलमध्ये रुपांतर केले आहे.  या जागेवर बेकायदेशीरपणे बांधकामात बदल करण्यात आला आहे, असे पालिकेने तक्रारीत म्हटले होते. 

पालिकेच्या सर्व आरोपांचे सोनू सूदने खंडन केले आहे. इमारतमधील बदलासाठी आपण पालिकेकडून यूझर चेंजसाठी परवानगी घेतली आहे. आता फक्त महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून मंजूरी मिळणे बाकी आहे. त्यामुळे सध्या मी कामही थांबवले आहे, असे सोनू सूदने म्हटले आहे. 

महाराष्ट्र प्रदेश आणि नगररचना कायद्यांतर्गत इमारतीत अनियमित बदल केले आणि जागेचा वापर बदलून निवासी इमारतीचे हॉटेलमध्ये रूपांतर केले. यावरून पालिकेची आवश्यक परवानगी घेतली नाही, असे तपासणीत आढळले होते. त्यानंतर पालिकेने गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये सोनूला एमआरटीपी कायद्यांतर्गत नोटीस बजावली होती. त्याविरोधात सोनूने दिवाणी न्यायालयात कठोर कारवाई होऊ नये म्हणून तातडीचा अर्जही केला होता. मात्र, दिवाणी न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावतानाच त्याविरोधात अपील करण्यासाठी त्याला तीन आठवड्यांची मुदत दिली होती. त्याचा अर्ज फेटाळला जाताच पालिकेने जुहू पोलिसांत चार जानेवारीला लेखी तक्रार दिली.


हेही वाचा -

विद्यार्थ्यांसाठी महापालिका करणार २० कोटींच्या मास्कची खरेदी

विनातिकीट प्रवास करणाऱ्या 'इतक्या' प्रवाशांवर मध्य रेल्वेची कारवाई


पुढील बातमी
इतर बातम्या