Advertisement

विद्यार्थ्यांसाठी महापालिका करणार २० कोटींच्या मास्कची खरेदी

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असला तरी सुरक्षेच्या दृष्टीनं मास्क घालणं व सामाजिक अंतराच्या नियमांचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

विद्यार्थ्यांसाठी महापालिका करणार २० कोटींच्या मास्कची खरेदी
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असला तरी सुरक्षेच्या दृष्टीनं मास्क घालणं व सामाजिक अंतराच्या नियमांचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. शिवाय हळूहळू मुंबईतील सर्व उद्योगधंदे, दुकानं सुरू झाली असून शाळाही हळुहळु सुरू होत आहेत. त्यामुळं महापालिकेनं आपल्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी तब्बल २० कोटी रुपये खर्च करून ७५ लाख मास्क खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोरोनामुळे तूर्तास शाळा बंद आहेत. मात्र भविष्यात शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी मास्क खरेदी केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, प्रशासनानं २ वर्षांसाठी मास्क खरेदीचा घाट घातल्यानं नगरसेवकांकडून टीका होऊ लागली आहे. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सुरक्षिततेची बाब म्हणून मास्क वापर, सामाजिक अंतराच्या नियमाचं पालन आणि सॅनिटायझरचा वापर करावा लागणार आहे. 

ही बाब लक्षात घेत प्रशासनाने पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी तब्बल ७५ लाख मास्क खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांला २५ मास्क देण्यात येणार आहेत. पुढील २ वर्षांसाठी मास्क खरेदी करण्यात येणार आहेत.

एक मास्क धुऊन ३० दिवस वापरता येऊ शकते. त्यामुळे एका शैक्षणिक वर्षांसाठी एका विद्यार्थ्यांला १० मास्कची गरज आहे. असे असतानाही २५ मास्क देण्यात येणार आहेत. यावरून नगरसेवकांनी प्रशासनावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. सध्या निर्माण झालेल्या अर्थसंकटात गरजेपुरत्या मास्क खरेदी करण्याऐवजी त्या दामदुप्पट संख्येने घेण्यात येत आहेत. तूर्तास एका वर्षांसाठी त्या खरेदी कराव्या. पुढच्या वर्षी गरजेनुसार खरेदी करावी, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे.

नगरसेवक निधीतून नागरिकांसाठी मास्क खरेदी करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून होत होती. मात्र त्यास प्रशासनाने परवानगी नाकारली. आता प्रशासनच विद्यार्थ्यांच्या नावाखाली २ वर्षांसाठी मास्क खरेदीचा घाट घालत आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा